Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सायली

राधिकाचा निर्णय ऐकून आई तीन ताड उडालीच. “अहो ऐकलंत का? जन्मभर अविवाहित राहणार म्हणते आहे आपली राधा.” आपला आवाज शेवटच्या टिपेला पोहोचेल, इतक्या जोरात ओरडून सरलाताई राधाच्या बाबांना बोलावत होत्या. तसे वसंतराव आपल्या खोलीतून बाहेर आले.
” दोन महिन्यांनी तिशी पूर्ण होईल तिची. अजून लग्न जमत नाही पोरीचे. सगळया मुलांना नकार देत आली आजपर्यंत. का? तर यांच्या अपेक्षा पडल्या जास्त! उद्या लोकं आम्हालाच बोल लावतील. काहीतरी दोष आहे मुलीत. म्हणूनच लग्न लावले नाही पोरीचे.
आई -वडील म्हणून आमचा काही हक्क, अधिकार आहे की नाही तुझ्यावर? का तू म्हणशील तेच खरे? अगं सारं काही जमवलं आम्ही. पैसा -अडका, सोन-नाणं, कुणासाठी! तुझ्यासाठीच ना? आता आम्ही काय आयुष्यभर तुझ्यासोबत राहणार आहोत का? आमच्यापाठी हा समाज काय तुला एकटीला धड जगू तरी देईल का? विचार कर जरा. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत तुझी काळजी लागून राहिल आम्हाला.” इतके बोलून आई चिडचिड करत स्वयंपाक घरात गेली. रात्रीचा सगळा स्वयंपाक करायचा बाकी होता अजून.

तशी राधा बेफिकिरीने वसंतरावांना म्हणाली, “बाबा काय कमी आहे मला? राहायला हे मोठं घर आहे. चांगली नोकरी आहे मला आणि पगारही उत्तम आहे. पण का कोण जाणे? मला घर -संसार ,मुलं -बाळ यात नाही अडकून राहावंस वाटत.”

“उद्या तुझ्या पाठच्या भावाचे लग्न होईल. वहिनी घरात येईल. ती तुझ्या अशा निर्णयाला पाठिंबा देईल का? अडचण होईल तिला तुझी. तेव्हा आम्हालाही काही बोलता यायचे नाही.” आई आतून ओरडून म्हणाली.
“मनातलं बोलायला, आधाराला हक्काचं माणूस हवं की नको?

अहो समजून सांगा तिला. स्वतः च्या जगातून बाहेर पडा म्हणावं जरा. उद्या प्रेमात बिमात पडशील, तर या साऱ्या गोष्टी विसरून लगेच लग्नाला उभी राहशील! म्हणे मला अडकून राहावं वाटत नाही.”
सरलाताईंचा आवाज कापरा झाला. तसे वसंतराव उठून स्वयंपाकघरात गेले. सरलाताईंचे डोळे पुसत हळूच म्हणाले, ‘मी सगळं ठीक करतो. तू अजिबात काळजी करू नकोस.”

मग दुसऱ्या दिवशी वसंतरावांनी आपल्या मुलाचे पवनचे नाव विवाह संस्थेत नोंदवले. योगायोगाने अगदी दोन महिन्यातच त्याचे लग्न ठरले. नवी ‘सून’ घरी आली तसे आई- बाबा खुश झाले. सारे काही तिच्या कलाकलाने घेऊ लागले. तिचे लाड करू लागले. आता तर सुनेशिवाय आईचे पानही हलेना. आईच्या तोंडी सारखे सुनेचेच कौतुक!

तर इकडे “माझी जागा आता सुनेने घेतली” म्हणून राधा वहिनीचा रागराग करू लागली. पण राधाचे नाव आता घरच्यांच्या लिस्टमधून जणू गायबच झाले. तिच्याकडे फारसे कोणी लक्ष देईनात. लग्न कर म्हणून मागे लागेनात. आईची चिडचिड जशी थांबली, तसे राधाला वाटू लागले, जणू काही आपलं अस्तित्वच या घरातून, साऱ्यांच्या मनातून
हद्दपार झाले आहे!

नव्या नवलाईने बावरलेली वहिनी आता खुलू लागली. नव्या नवरीचे तेज तिच्या चेहेऱ्यावरचे सौंदर्य वाढवत होते. किती आनंदी आणि छान दिसत होती ती! राधा मूकपणे सारे पाहत होती.

वहिनी आता दादासोबत हातात हात घालून फिरायला जाऊ लागली. आपल्या नवऱ्याची मर्जी राखू लागली. तिचे लाजणे, नटणे पाहून राधाच्या मनात कारंजी उडू लागली. दादाचे आणि तिचे बाँडींग पाहून राधालाही कोणीतरी “सोबती ” हवाहवासा वाटू लागला.
तिचे मन म्हणू लागले, “अविवाहित राहण्याचा निर्णय बदलावा का? इतकी सारी स्थळे पहिली. पण माझ्या अपेक्षा जरा जास्तच वाढल्या. त्या हट्टापायी अनेक चांगली स्थळं नाकारली मी. आई बाबांचे मन दुखावले. प्रेमभावना मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जणू बंदिस्त करून टाकल्या. आता तिशी ओलांडल्यानंतर या घोडनवरीला मनाजोगे स्थळ मिळण्याचा योग कमीच.

सांगावे का आई -बाबांना, पुन्हा मुलं पाहायला? की वहिनीला सांगावे! नकोच. तिचा उगीच रागराग केला मी. यात तिची काय चूक? ती तर सुनेचे कर्तव्य पार पाडते आहे. किती प्रेमाने वागते, बोलते साऱ्यांशी. जणू या घरची लेकचं आहे.
सारखी माझ्या मागे -पुढे करत राहते, ताई, ताई म्हणून.”

“ताई चहा घेताय ना?” इतक्यात वहिनी चहा घेऊन आल्याने राधाची तंद्री भंगली. राधाने बळेच तिला आपल्याजवळ बसवून घेतले.
“तू घरातलं साऱ्यांच करून थकत नाहीस का गं कधी?” राधाने चहाचे घोट घेत घेत तिला विचारले. “नाही ताई आपल्या माणसांच करण्यात कसला आलंय थकवा? उद्या तुम्ही सासरी गेलात ना, तर असेच वागाल बरं.” वहिनी सहज बोलून गेली खरी आणि पुढे राधाच्या डोळ्यात खोलवर पाहत ती म्हणाली, “ताई तुमच्या मनातही आहेत या साऱ्या भावना. पण तुम्ही बोलून दाखवत नाही इतकंच. हो ना? तुम्हाला वाटेल, घरात एकट्या पडलात तुम्ही. पण घरातील साऱ्यांचे बारीक लक्ष आहे हा तुमच्यावर. तुमचा बदललेला स्वभाव आई- बाबांना सुखावतो आहे. तुमच्या मनातली ओढ जाणवते बरं आम्हाला.
आता फक्त तुमची ती ‘अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा’ विसरून ‘बोहोल्यावर चढण्याची ‘ तयारी हवी.” असे म्हणत राधाकडे पाहून वहिनीने डोळे मिचकावले.
माझ्या मावसभावाने शेखरने तुम्हाला लग्नासाठी कधीची मागणी घातली आहे. पण “जोवर तुमचा निर्णय बदलत नाही, तोपर्यंत घरात कुणी हा विषय काढायचा नाही” अशी बाबांची सक्त ताकीद आहे साऱ्यांना.”

हे ऐकून राधाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. “वहिनी अगं कुठली प्रतिज्ञा आणि काय? ते आपलं असंच…जाऊ दे गं! म्हणतात ना.. प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो. पण ते शेखर काय म्हणाले? सांग ना जरा.
राधा अशी गोड हसून, लाजलेली पाहून वहिनी ही ‘आनंदाची बातमी’ सांगायला आत पळाली.
“अरेच्या..आपल्याला लाजणंही जमतयं! तशाच बाकी गोष्टीही झकास जमतील की.”असे म्हणत राधा आपल्या लग्नाच्या सुखद स्वप्नात रंगून गेली.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *