Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® सौ. गीता गजानन गरुड.

“अगं ए सोना, कुठं मरायला गेलतीस? बाईच्या जातीनं कसं अग्गतीनं र्हावं. हिचं आपलं हाय,दिसभर पोरांसंगती गोट्या काय खेळती न् कबडी काय खेळती. चल घरला न्हायतर पाय मोडून घालीन बघ.”

“काय गं माय, एकच डाव खेळूदे मले. माझी ब्याटींग हाय.”

” ती ब्याटींग नको नि फ्याटींग नको, चल घरला. कामं पडलीत मोप. पानीव इल आता. जा बाडली घिऊन नळाकडं नि नंबर लाव जा बिगीबिगी.”

“पन आये, संतुला का खेळाया दितीस तू. मलाबी खेळायचं हाय.”

“चल घरला म्हंती ना. माझं तोंड चाळवू नगं.”

सोनाली मुकाट्याने आईसोबत घरी आली. बादली,कळशी घेऊन नळावर गेली. अगदी तिसरीचौथीत असल्यापासनं ती कळशीने पाणी भरायची. आपला अभ्यास सांभाळून आईला प्रत्येक कामात मदत करायची.

कामाबद्दल तिची तक्रार नसायची. आपली आई एकटी काम करते,आपणपण तिला हातभार लावला पाहिजे हे तिला कळत होतं. पण तिला खंत एका गोष्टीची वाटायची ,ती तिचा भाऊ,संतोष तिच्यापेक्षा जेमतेम वर्षभराने मोठा पण आई त्याला काहीच काम सांगायची नाही.

ताटपाणी घ्यायचं असलं की सोनालीलाच हाका मारायची.

“संतुला त्याचं पाणी घेयाला सांग..”सं तिनं म्हंटलं तर आई म्हणायची,”आगं,बापयामानूस त्यो. बापयामानूस असली हलकी कामं करत नायत. ती आपन बायामानसांनीच करायची असत्यात.” सोनालीची मग अधिकचच चीडचीड होई.

तिचे वडीलही कामावरुन घरी आले की पेपर वाचत बसत. कधी त्यांनी झाडू हातात घेतलेला सोनालीने पाहिला नव्हता. आईच्या अडचणीच्या दिवसांत आज्जी घरातलं काम करायची.

आज्जी गेल्यावर मात्र, आईच्या त्या चार दिवसातली सगळी कामं सोनालीला करावी लागत होती. कधी शाळेत परीक्षा असली की घरकाम नि अभ्यास यात ती पुरती थकून जाई.

सोनालीचे वडील, सुट्टीला मित्रांसोबत पत्ते कुटत बसायचे. प्याले की धिंगाणा घालायचे. सोनालीच्या आईला लाथाबुक्क्याने हाणायचे. शिव्या घालायचे. तिच्या माहेराचा उद्धार करायचे.

दुसऱ्या दिवशी सकाळी, तिचं तोंड पुरतं सुजलेलं असायचं,केस पिंजारलेले. त्याही अवस्थेत ती मुलांना शाळेत सोडायला जायची. एकदोघी विचारायच्या,”काय वं डोळे का सुजल्याले,नि हे हातावर वळ कसले..” त्यावर सोनाची आई पुसटसं हसायची. सोनालीला मात्र शरमल्यागत व्हायचं.

बाईच्या जातीनं सगळं सहन केलं पाहिजे. नवरा,बाईचा मालक असतो. त्याच्या तालावर नाचलं पायजेल,तो उठ म्हणला काय उठलं पायजे नि बस म्हणला काय बसलं पायजेल.

त्याने कितीबी शिव्या घातलान,मारलन तरीबी त्याच्याच छताखाली रहावं लागतय, त्यातच बाईचं बाईपण असतय. हे असं तत्त्वज्ञान सोनालीला तिची आई जातायेता शिकवायची.

सोनालीला मग शाळेतल्या बाईच जास्त आवडायच्या. बाई म्हणायच्या,”मी सात जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून वड पुजायला जात नाही. पण माझ्या नवऱ्याच्या आहारविहाराबाबत मी दक्ष रहाते, त्याची सुखदुःख शेअर करते. तोही माझं म्हणणं ऐकून घेतो. मला हवी ती स्पेस देतो.”

सोनालीला, हे बाईंचं जग फार आवडायचं. नकळत बाई तिच्यासारख्या कित्येकींवर पुढील आयुष्यात नवराबायकोचं नातं कसं असावं याचे संस्कार रुजवत होत्या.

अर्थात बाई व आई, दोघींच्या आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक स्तरात तफावत होती..त्यामुळेही काही जुन्या बुरसटलेल्या विचारांचा पगडा सोनालीच्या आईवर जास्त होता. ती त्यातून बाहेर पडू इच्छित नव्हती.

आपलीही आर्थिक,सामाजिक प्रगती व्हायची असेल तर शिक्षणाशिवाय चांगला पर्याय नाही,हे सोनालीच्या मनाने जाणलं. शाळेतून मिळणाऱ्या गोष्टीच्या पुस्तकांतील बोधकथाही तिच्या मनावर खोलवर परिणाम करत होत्या.

घरातली कामंधामं सांभाळून ती जीव तोडून अभ्यास करु लागली. बुद्धीने तशी बेताचीच पण चिकाटी,सातत्य या गुणांच्या आधारावर शाळेत पहिल्या दहांमधे झळकू लागली. दहावी खूप चांगल्या गुणांनी पास झाली. पुढे काय,विचार करत होती.

भाऊ कॉलेजला जाऊ लागला होता. हिलाही जायचं होतं पण आई म्हणू लागली,”पोरीच्या जातीला काय करायचंय जास्त शिकणं. शिकलीस तेवढं पुरे. कुठलातरी कोर्स कर नि कमवायला लाग. तुझ्या लग्नासाठी चार पैसे जमतील बघ.”

सोनाली शाळेचा दाखला घ्यायला गेली असता,बाई तिला भेटल्या. तिने पेढे न्हेले नव्हते पण बाईंना वाकून नमस्कार केला. “

सोनाली,कुठल्या कॉलेजचा फॉर्म भरलास?..”बाईंनी विचारताच सोनालीच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

त्या भाबड्या मुलीला आपले अश्रु लपवता आले नाहीत. बाईंनीच तिला कँटीनमध्ये न्हेलं,वडा खाऊ घातला.

सोनालीने सांगितलं,”आई म्हणते,शिकलीस तेवढं खूप झालं. आता कमव,लग्नासाठी चार पैसे साठव.”

संध्याकाळी शाळा सुटली तशा बाई स्वतः सोनालीच्या घरी गेल्या. त्यांनी सोनालीचे आईवडील,दोघांनाही समोर बसवलं. त्यांना विनंती केली,”सोनालीला शिकू द्या. तिची शिक्षणाची वाट अडवू नका. मुलगी शिकली तर तिचं पुरं कुटुंब सुशिक्षित करते.”

आता एवढी मोठी शाळेतली बाई असं म्हणतेय म्हणल्यावर सोनालीच्या आईवडिलांना तिचं ऐकणं भाग होतं..त्यांनी बाईंचं म्हणणं मन मानत नसतानाही मान्य केलं.

सोनालीही कॉलेजात जाऊ लागली. शिकू लागली. तिच्या विचारांच्या कक्षा रुंदावू लागल्या. ती आपली मतं आईवडिलांपुढे मांडू लागली. बाप दारु पिऊन आईला मारझोड करायला लागला तर एखादं फळकुट उचलून त्याच्या अंगावर धावे. बऱ्याचदा तो बरा असताना त्याला दारुची संगत सोड म्हणून विनवे.

सोनाली बीए झाली. एका टुर्स अँड ट्रेव्हल्सच्या  ऑफिसात कामाला लागली. तिथे येणाऱ्या कस्टयर्सना टुरविषयी माहिती देणं,तिथलं वास्तव्य,जातायेतानाच्या प्रवासातील सोयी,तिथली प्रेक्षणीय स्थळं..हे सगळं समजावून सांगे.

महेश कोल्हे,आपल्या आईवडिलांकरता अष्टविनायक यात्रेचं बुकींग करण्याकरता आला असता,सोनालीचं तपशिलवार माहिती देणं,तिचा विनम्रपणा,बोलके डोळे,गालावर पडणारी खळी..महेशची विकेट गेली. तो आता अधनंमधनं त्या ऑफिसच्या वाऱ्या करु लागला.

ऑफिसचे मालक श्री. लोटलीकर यांच्या लक्षात सारा प्रकार आला. सोनालीचं मनही महेशमधे गुंतू लागलं होतं.

लोटलीकर स्वतः महेशचे आईवडील यात्रेवरनं आल्यावर त्यांना जाऊन भेटले. म्हणाले,”दोन प्रेमपाखरं आमच्या ऑफिसात गुटुरगुटुर करु लागलेत. त्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून टाका.”

महेशचे आईवडील स्वतः सोनालीच्या घरी तिला मागणी घालायला गेले. सोनालीची आई म्हणाली,”तुमी कुठं,आमी कुठं..तुमच्यासारख्यांशी सोयरीक जुळवली तर लग्नासमारंभात खर्च कराया तसा पैका पायजेल. न्हाई जमायचं.”

सोनालीचे सासरे म्हणाले,”खर्चाची बिल्कुल चिंता करु नका. तुम्ही फक्त मुलगी नि श्रीफळ घेऊन या.”

अशारीतीने महेश नि सोनालीचं लग्न लागलं. सोनाली सासरी गेली. वनबीएचकीचा ब्लॉक तो सोनालीला तिच्या टिचभर घराच्या तुलनेत बंगलाच वाटायचा.

महेश तिच्यावर भरभरुन प्रेम करत होता. सोनाली तिथल्या प्रत्येकाच्या वागण्याचं निरीक्षण करायची. सकाळी आंघोळपांघोळ झाली की तिचे सासरे स्वतः बाथरुम,टॉयलेट घासून स्वच्छ करायचे.

महेश,अंथरुणांच्या घड्या करायचा. बेसिन धुवायचा, ओला कचरा,सुका कचरा घंटागाडीत न्हेऊन द्यायचा. आला की घरातल्या इथेतिथे पडलेल्या वस्तू जागच्याजागी ठेवून सगळ्या रुममधला केर काढायचा.
पंधरवड्यातनं एकदा सगळीजणं मिळून खिडक्या,पंखे पुसायची,कोळीष्टकं काढायची. महेशचे बाबा कणिक तिंबून द्यायचे,बाजारहाट करायचे. भाजी निवडून द्यायचे. महेशच्या आईला दुखलंखुपलं तर विचारायचे.

महेशची धाकटी बहीणही कॉलेज सांभाळून घरातली कामं करायची. सकाळी आईला पोळ्या लाटून द्यायची,चहानाष्ट्याची भांडी विसळायची.

थोडक्यात सोनालीच्या सासरी प्रत्येकाने थोडीथोडी कामं वाटून घेतली होती. प्रत्येकाच्या मताचा आदर राखला जात होता. बाईची जात,बाईच्या जातीचीच कामं ही..हे सासरी आल्यापासनं तिला ऐकायला लागत नव्हतं.

सासू तिला त्यांच्या चालीरिती,स्वैंपाक सारं हळूहळू शिकवत होती. सोनालीच्या आवडीनिवडी,तिच्या माहेरकडच्या पद्धतीही जाणून घेत होती. सोनालीचं संकुचित मन सासरी अलवार खुलत होतं,बहरत होतं.

तिला आता घरी बसायचा कंटाळा आला होता. तिच्या सासूला तिने भीतभीत पुढे शिकायचं आहे. एलएलबी करायचं आहे म्हणून सांगितलं. सोनालीची पुढे शिकण्याची इच्छा ऐकून तिची सासू खूष झाली,म्हणाली जरुर शीक..आणि सोनालीने लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. पुढची दोन वर्ष मन लावून अभ्यास केला. महेशनेही तिला साथ दिली. बाळाचा विचार काही वर्षांकरता पुढे ढकलला.

सोनाली हुंडाबळीची पहिली केस जिंकली, तेव्हा एका सामाजिक संस्थेने तिचा सत्कार केला असता तिने विनम्रतेने सांगितलं,” मला माझ्या सासूबाईंनी पुढे शिकू दिलं. सासूबाई,नवरा,नणंद,सासरे..सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले..म्हणून मी इथपर्यंत पोहोचले.

बाईला सासरच्यांचा योग्य पाठिंबा मिळाला तर ती नक्कीच तिच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करु शकते..”

सोनालीने, सासूबाईंना व्यासपीठावर बोलावलं.आपल्याला मिळालेली शाल तिने सासूच्या अंगावर पांघरली. मानचिन्ह सासूच्या हाती दिलं व सासूसासऱ्यांच्या पाया पडली.

सासूच्या गळ्यात गळा घालत म्हणाली..असं सासर सुरेख बाई!!

–©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *