Ritbhatmarathi

Search
Close this search box.


‘‘मी एकटा पडलोय ग’’ या त्याच्या वाक्याने तिच्या डोक्यात एक रागाची तिडीक उमटली. आता याला सुचतंय हा एकटा पडलाय आणि मी? मी एकट्याने इतके वर्षं आयुष्य काढलं त्याचं काय? माझ्या मुलापासून मला तोडलं याच्या आईने… तिच्या रागाचा पारा चढत गेला. अश्रू डोळ्यात साठले. अनेक मान-अपमान तिला आठवले.

किती सुंदर स्वप्नं डोळ्यात साठवून ती त्याच्या घरात गेली होती. हो त्याचंच घर कधी आपलेपणा असा वाटलाच नाही त्या घराबद्दल. म्हणजे तिला खूप वाटत होतं, पण ती कधी आपलं घर म्हणाली तर सासूच्या डोळ्यात लगेच रागाची भावना जाणवायची. मग सासू तिला तिच्या नवर्‍याने किती कष्टाने घर उभं केलं याची महती सांगायची. त्यामुळे कायम सासूचा वरचष्मा आणि तो तो आईच्या ताटाखालचं मांजर. आईने कष्टाने संसार उभा केला, वडिलांच्या माघारी सांभाळलं. कधीकधी रिमाला वाटे, ‘‘मी काय करणार? आईने आपल्या मुलाला सांभाळलं यात माझा काय दोष? आईने आपल्या मुलाला सांभाळायलाच हवं.’’

तरी रिमा सर्व मागे टाकून घरातली कामं करत होती, नोकरी करत होती, अशातच दिवस राहिले. आता तरी आपला नवरा सुधारेल. आपली काळजी घेईल असं रिमाला वाटत होतं, पण झालं उलटंच मूल होईपर्यंत गोड गोड वागणारी सासू मूल झाल्यावर मात्र परत आपला पहिला रंग दाखवू लागली. रिमाचा नवरा निशांतही तसाच. तोही आपल्या आईच्या मताप्रमाणेच वागत होता. रिमाला सासू तिच्या मुलालाही घेऊ देत नसे. ते मूल ती स्वत:च्याच ताब्यात ठेवत असे. रिमाची माहेरची परिस्थितीही यथातथाच असल्याने परत माघारी फिरणंही तिला शक्य नव्हतं. म्हणून ती संसार रेटत होती. पण पुढे पढे तिला हे सर्व असह्य होत होतं, कारण तिचा मुलगाही तिला अतिशय तुच्छ वागणूक देत होता. त्या लहान मुलाची काही चूक नव्हती. त्याला जसं शिकवलं जात होतं तसंच तो वागत होता, पण त्याच्या अशा वागण्याने रिमाच्या मनावर मात्र फार वाईट परिणाम होत होता. शेवटी एक दिवस ती ते घर सोडून निघून गेली. देवाच्या दयेने तिच्या हातात नोकरी होती.

घर सोडून गेल्यावर काही दिवस लेडीज हॉस्टेलवर राहिली, मग तिने स्वत:च्या आईला या प्रकरणाबद्दल कल्पना दिली. आई तिच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. ती आणि तिची आई एक छोटीशी भाड्याची खोली घेऊन राहू लागले. रिमाला आधार मिळाला, पण तरीही तिला खूप एकटं वाटायचं. विशेषत: स्वत:च्या मुलाची खूप आठवण यायची, पण ती काही करू शकत नव्हती. कधीतरी ती त्याला भेटायला जात असे, पण त्याला तिच्याबद्दल काहीच माया नव्हती. फक्त एकच चांगलं होतं की मुलगा अभ्यासात हुशार होता. जसजसा तो मोठा होत गेला तसतशी त्याला घरातली परिस्थिती समजू लागली. कधी कधी आपल्या वडिलांचा आणि आजीचा राग येऊ लागला, पण तो काही करू शकता, नाही म्हणायला आईला कधीमधी भेटायला जायचा. पण फारशी माया तो लावू शकला नाही. एक अंतरच पडत गेलं. रिमाचं एकटेपण काही सुटलं नव्हतं.

हळू हळू मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं. त्याच्या बायकोने त्याला घरापासून, बापापासून, आजीपासून तोडलं आणि ती दुसर्‍या देशात निघून गेली. मुलगा आणि आई दोघंच राहिले. आईला आता काम झेपेना. तिने एकदोन वेळा रिमाशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. आपण चुकलो असं नाटक करण्याचा प्रयत्न केला, पण रिमाही काही आता पूर्वीची साधीभोळी रिमा राहिली नव्हती ती आता एका कंपनीत मोठ्या हुद्यावर होती. तिच्या हाताखाली 25 लोकांचा स्टाफ होता. कोणाशी कसं वागायचं याचं तिला बरोबर ज्ञान होतं. तिने सासूला फटकारून टाकलं. सासूने नवर्‍याला पाठवलं त्याला तर तिने अक्षरश: हाकलून काढलं.

आता ना सासू राहिली होती ना रिमाची आई, पण अलीकडच्या काळात रिमाने खूप सार्‍या मैत्रिणी जमवल्या होत्या. हाताखालच्या मुला-मुलींना आईची माया दिली होती. अनेक जणांनी तिला बहीण मानलं होतं. आता ती एकटी होती तरीही एकाकी नव्हती. खूप मायापाश तिने जोडले होते. एक हाक मारली तर 100 लोकं तिच्या मदतीला आले असते, येत होते. अशातच एक दिवस तिला निशांतचा मेसेज आला,

‘‘मी एकटा पडलोय ग, मला तुझी आठवण येते.’’

तिने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. काही लोकांकडून तिला कळलं की, निशांत व्यसनाधीन झाला आहे. आयुष्यात केलेल्या चुकांचा त्याला पश्‍चात्ताप होत आहे. मुलगा आपल्या वडिलांकडे बघायला तयार नाही.

वारंवार निशांत तिला मेसेज करत होता मी एकटा आहे. शेवटी एक दिवस रिमा उठली. ज्या घराची पायरी चढायची नाही अशा घरी गेली. घराचं दार उघडताच तिला त्याच्याबद्दल दया आली. दारू पिऊन तो सोफ्यावर पडला होता. खाण्यापिण्याची आबाळ झाल्याने त्याची तब्येत खालावली होती. असं वाटत होतं की तो आता हा फार दिवस काढणार नाही. रिमाने गाडी बोलावली. गाडी येईपर्यंत घर स्वच्छ आवरलं. त्याला उठवलं त्याचं आवरलं. रिमाला बघून तो ढसाढसा रडला. तिची माफी मागितली.

‘‘तू मला घेऊन जातेयस ना रिमा?’’ त्याने विचारलं.
‘‘हो..’’ एवढंच उत्तर तिने दिलं.

गाडी आली. रिमाने त्याची बॅग भरलीच होती. त्याच्यासह ती गाडीत बसली. खूप दिवसांनी त्यानं रिमानं केलेलं उपीट पोटभर खाल्लं होतं. स्वच्छ आंघोळ केली होती.

‘‘आता आपण असं करू, तसं करू, मी तुला मदत करेन.’’ तो अखंड बडबडत होता. रिमा जास्त काही न बोलता ‘‘हो हो.’’ म्हणत होती.

गाडी एका आश्रमाच्या दाराशी येऊन थांबली.

‘‘इथे कुठे आलो आपण? इथे राहतेस तू रिमा?’’ त्यानं न राहवून विचारलं.
‘‘नाही मी माझ्या घरात राहते. तू इथं राहायचं आहेस.’’ म्हणत रिमाने त्याला त्याच्या खोलीत सोडलं.
त्याच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं.

जाताना रिमाचा हात त्याने धरला होता. ती निघताना तिचा हात हातात घेऊन म्हणाला,
‘‘रिमा, मी एकटा पडलोय ग, पण तू मला एकाकी पडू दिलं नाहीस, तू माझी मदत केलीस, मी मात्र…. मी तुझा अपराधी आहे, जमलं तर मला माफ कर.’’

रिमाचे डोळे भरून आले होते, पण भावनाविवश व्हायच्या आधी ती तिथून निघाली. आता तिला एकटं जगायची सवय झाली होती कुणाच्याही सोबतीशिवाय…


©️®️सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

==================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *