Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सौ मधुर कुलकर्णी

वृंदाने वाफाळलेला चहा कपात ओतला. संदीपला हाक मारली.संदीपच्या कानाला मोबाईल आणि जोरजोरात हसणं सुरू होतं.

   वृंदा चिडलीच. संदीपचे फोनवर बोलणे झाल्यावर तिचा राग बाहेर पडलाच. ” इतक्या सकाळी कोणाचे फोन येतात हो तुम्हाला? उठल्या उठल्या कुणाची तरी चेष्टा, मस्करी.”

    संदीपला कळेचना त्यात इतकं चिडण्यासारखं काय होतं? ” समीरणचा फोन होता ग.आम्ही पाचजण जे नुकतेच रिटायर झालोय ते सगळे लोणावळ्याला जायचा प्लॅन करतोय. मस्त पावसाळा आहे.आपली इनोव्हा घेऊन जातोय.”

   “आता ह्या वयात त्या भुशी डॅममधे  भिजणार आहात का?आल्यावर सगळे बसा मग ,घसा धरून आणि नाक पुसत.आणि आपली इनोव्हा नेणार म्हणजे त्यांची ट्रिप फुकट. तुम्ही कर्णाचे अवतार.” वरदाची चिडचिड अजूनच वाढली.  “चिरंजीवांना फोन लावा तुमच्या.ते कामात बिझी असतात पण दोन दिवस फोन आला नाहीतर इकडे आपल्याला काळजी वाटते ते त्यांना समजत नाही.हल्ली सून आली तरी ती आपल्याजवळ नसतेच.बायकांना मेली रिटायरमेंटच नाही.आयुष्यभर त्या स्वयंपाकघरात राबा.” रागारागातच वरदा आतल्या खोलीत गेली.

  वरदाचा पवित्रा बघून संदीपने राजला फोन लावला. “राज कसे आहात?प्राजक्ता आणि आमचं पिल्लू सारंग कसा आहे?”

  “बाबा,आम्ही तिघेही मजेत आहोत.दोन दिवस मला आणि प्राजक्ताला कामाचे खूप लोड होते.सॉरी,फोन करायचा राहिला.सारंग एकदम मजेत.शाळा, अभ्यास रुटीन सुरू आहे.”

  “अरे सॉरी कशाला बेटा. तुझा फोन आला नाही म्हणून मीच केला.मातोश्री काळजी करतात न.”

  “बाबा,आता तुम्ही रिटायर झालाय.इकडेच बंगलोरला आमच्याजवळ या.सारंग पण खुश होईल.आणि आता आईला पण आराम हवा.”

“अरे बाबा,त्यावरूनच आज ती चिडली आहे,बायकांना रिटायरमेंट नसते म्हणून.तिकडे यायला हरकत नाही रे पण आता इथे आमचा दोघांचाही मित्रपरिवार छान जमलाय. वेळ छान जातो.आणि दिवाळी आणि उन्हाळा एकत्र यायचं आपलं ठरलंच आहे न.”

  “हो तेही खरंच आहे.आम्ही दोघेही कामावर जाणार. येण्याची वेळ नक्की नसते.सारंगची दुपारची शाळा.आणि इथे तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. शिवाय भाषेचा प्रश्न आहेच.पण कधी कधी अपराधी वाटतं बाबा.आता खर तर आम्ही तुमची काळजी घ्यायला हवी.”

“राज,वेडा आहेस का? असं चुकूनही मनात आणू नकोस.आम्ही थकलो की तुझ्याचकडे येणार रे.पण तू आधी आईला फोन कर.तिला एन आर टी झालाय.”

  “एन आर टी? ही काय भानगड आहे बाबा?”

  ” नवऱ्याच्या रिटायरमेंटचा ताप  “

   ” लगेच करतो फोन बाबा.” संदीप आणि राज दोघेही हसायला लागले.

   वरदाच्या डोक्यात प्लॅंनिंग शिजतच होतं. तिने लगेच तिच्या मैत्रिणीला फोन लावला. “मीरा,आपण लोणावळ्याला ट्रिपला जातोय ह्या शनिवार,रविवारी.तू वैशाली आणि मेधाला फोन करून कळव.मी सुखदाला फोन करते.आमची इनोव्हा घेऊन जाऊ.ड्रायव्हर भाड्याने घेऊ.मला कुठलंही कारण नकोय.आपण जातोय.” तिने मैत्रिणीला बोलायची फुरसतच दिली नाही.

  “आता आठ दिवस रिटायरच होते,एकही काम करत नाही,म्हणजे मग कळेल माझी किंमत.” वरदा स्वतःशी पुटपुटत किचनमधे गेली.

    दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेताना तिने संदीपला सांगितलं, “संदीप,ह्या शनिवार, रविवारी आमचा भिशीचा गृप लोणावळ्याला जातोय.मला गाडी हवीय.आणि सगळ्याजणी पेट्रोलचं काँट्रिब्युशन देणार आहेत.”

  “अग, पण ह्या शनिवारी आमचं ठरलंय.तुम्ही नंतर जा.” संदीप चहाचा घोट घेत म्हणाला.

  “पुढच्या शनिवारी वैशालीला वेळ नाहीय.तुम्ही तुमचा प्रोग्राम पुढे ढकला.” वरदा खोटंच बोलली.तिला आता माघार घ्यायचीच नव्हती.

  संदीपला तिच्यापुढे नमतं घ्यावच लागलं.त्याने समीरणला फोन लावला. “अरे,आपण पुढच्या आठवड्यात जाऊ.ह्या शनिवारी वरदाला गाडी हवीय.त्यांचा भिशीचा गृप लोणावळ्याला चाललाय.”

  “हो,आमची सौ पण आहेच त्या गृपमधे.कानावर आलंय माझ्या.”

    “बालहट्ट,राजहट्ट आणि स्त्रीहट्ट ह्यात अजून एक भर घालायला हवी.बायकोहट्ट.तो सगळ्यात जास्त डेंजरस.” संदीप हसत म्हणाला.

  “बरोबर बोललास.ठीक आहे,आपण पुढच्या शनिवारी जाऊ.लेट देम एन्जॉय.” समीरण म्हणाला.

  शनिवारी सकाळी वरदा,मेधा,
वैशाली,सुखदा,मीरा अशा
पाचजणी जय्यत तयारी करून निघाल्या.शनिवारी रात्री रिसॉर्टमधे मुक्काम करून महडच्या गणपतीचे दर्शन घेऊनच रविवारी रात्री पुण्यात परतणार होत्या.भुशी डॅमच्या पाण्यात भिजायचं म्हणून कपडे जरा जास्तच घेतले.गॉगल,कॅप,टी शर्ट,जीन्स..सगळा मॉडर्न पेहेराव घालून आधी सेल्फी सेशन करायचं होतं.निघताना वरदा संदीपला म्हणाली, “मी नाहीय दोन दिवस तर लगेच मित्र जमवू नका.जरा घराची जळमटे काढा,पंखे पुसा.”

  “जी मालकीण” संदीपने तिची चेष्टा केली.

  “बघावं तेव्हा मेली चेष्टा नुसती.दूध रात्री फ्रीजमधे ठेवायला विसरू नका.देवाची फुलं संपली आहेत.हॉटेलमधून पार्सल मागवा आणि भांडी नीट विसळून घासायला टाका,नाहीतर सिंकमधे वास येतो.”

  “दोन दिवस आणि एक रात्र काढायची आहे तरी तुझ्या इतक्या सूचना.लोणावळा कॅन्सल करतेस का?”

  “अजिबात नाही हं.मला पूर्ण विश्रांती हवी आहे आठ दिवस.”

  “आठ दिवस? आणखी कुठला प्रोग्राम नंतर?” संदीपने आश्चर्याने विचारलं.

  “ते ठरवलं नाहीय अजून.ट्रिपहून आल्यावर बघू.निघते मी.” वरदाने बॅग घेतली आणि गाडीत बसायला गेली.

  गाडीत बसायच्या आधी भरपूर सेल्फी काढून झाले.संदीपच्या हातात मोबाईल देऊन त्यालाही फोटो काढायला लावले.सगळ्यांना अगदी शाळकरी मुलींसारखा उत्साह आला होता.संदीपचा मोबाईलची रिंग वाजली म्हणून त्याने बघितलं. समीरणचा फोन होता. “संदीप,सुखदा पोहोचली का तुझ्या घरी?”

  “अरे,निघाल्या सुद्धा सगळ्या आत्ताच.काय उत्साह प्रत्येकीचा.पण छान वाटत होतं रे बघून.रोजच्या रुटीन मधून त्यांना थोडा चेंज.”संदीप म्हणाला.

  “खरंय रे.आपली बायको साथ देते म्हणून संसार सुरळीत होतो.आपण नोकरी करतो म्हणून आपले कष्ट दिसतात.पण त्याही तेवढेच कष्ट घेतात.मी तर म्हणतो,आता आपणच ह्यांना दोन महिन्यातून एकदा तरी अशी ट्रिप प्लॅन करून द्यायला हवी.त्यांची पण बॅटरी चार्ज होईल.”

“छानच आयडिया समीरण. बरं,तू आज रात्री जेवायला इकडेच ये. तिथे एकटा जेवण्यापेक्षा इकडे ये. काहीतरी मागवतो हॉटेलमधून.”

  “ओके,येतो.भेटू मग.”समीरणने फोन बंद केला.

    भुशी डॅमला पाऊस चांगलाच कोसळत होता.पाचही जणी मनसोक्त भिजल्या आणि रेन डान्स सुद्धा केला.डॅमवरून खाली उतरताना कसा कुणास ठाऊक वरदाचा पाय घसरला आणि ती फरफटत खाली आली.काही क्षण तिला कळेचना काय झालं.आजूबाजूच्या पर्यटकांनी तिला उचलून शेड मधे नेलं आणि झोपवलं.पाठीला,पायाला खूप खरचटलं,मुका मारही बराच होता.रिसॉर्टमधे तिला नेऊन फर्स्ट एड केलं पण खरचटल्यामुळे तिच्या जखमा दुखायला लागल्या.रात्री डॉक्टरांनी तिला झोपेची गोळी दिली.दुसऱ्या दिवशीचा महडच्या गणपतीचा बेत रद्द करून सगळ्या पुण्याला परत निघाल्या.

  दारात सकाळी दहा वाजता खिडकीतून इनोव्हा बघून संदीपला आश्चर्यच वाटलं.तो बाहेर आला.
सुखदा आणि मीरा वरदाला आधार देऊन गाडीतून उतरत होत्या,” भाऊजी, वरदा तिथे पाय घसरून पडली.बराच मार लागलाय.तिला चालताही येत नाहीय.”

  संदीपने वरदाला लगेच उचललं आणि आत बेडरूममध्ये झोपवलं.

  “सुखदावहिनी,तुम्ही गाडी घेऊन जा.सगळ्यांना घरी सोडून ड्रायव्हरला गाडी तुमच्याकडे ठेवायला सांगा.मी उद्या गाडी घ्यायला येतो.”

  “चालेल, येतो आम्ही.वरदा जरा नाराज झालीय.आपल्यामुळे ट्रिप अर्धवट झाली असं तिला वाटतंय. तसं काहीही नाहीय.तिची तब्येत महत्वाची.काळजी घ्या.” सुखदा काळजीने बोलली.

   संदीप बेडरूममधे  आला तर वरदा रडत होती.
  “वरदा,खूप दुखतंय का ग?मी डॉक्टरकडे जाऊन येतो.आणखी जास्तीची कुठली औषध देतात का बघू.कुलुपच लावून जातो.तू शांतपणे झोप.”

   वरदाला औषधांची ग्लानी होतीच.मजा करायला गेली आणि सजा मिळाली असं झालं.डोक्यात तेच विचार.पाठीतून कळा इतक्या येत होत्या की तिला आधाराशिवाय उठताही येत नव्हतं.ती डोळे मिटून पडून राहिली.

सकाळच्या चहापासून संदीप तिची सेवा करत होता.दुपारी औषध घेऊन वरदा झोपली होती.अचानक तिला “आजी आजी” ऐकू आलं. आधी वाटलं स्वप्नच बघतोय पण डोळे उघडले तर सारंग तिला हलवून जागा करत होता.
  “माझं बाळ ते.तू कधी आलास?” वरदाने आश्चर्याने विचारलं.

  “तास झाला आम्हाला येऊन आई.फ्लाईट जरा लेट झाली.”प्राजक्ताने चहा,आणि गरम पोहे आणले.

  “अग, पण तुम्हाला रजा मिळाली का?का मी पडल्याचे संदीपने कळवले?”

  “नाही हो आई.राजला पुण्यात काम होतं, मग मी वर्क फ्रॉम होम ची परवानगी घेतली.आणि सारंगचा सिनिअर के जी चा असा किती अभ्यास बुडणार?तो कव्हर करता येतो.तुम्ही मस्त गरम पोहे खा.”प्राजक्ता तिला आधार देत उठवत म्हणाली.

  “आल्या आल्या तुला किचनमधे काम.”

“तो विचार तुम्ही करू नका.मस्त आराम करा मी आहे तोपर्यंत.”

  वरदाने संदीपकडे शंकेने बघितलं.”वरदा,मी फोन करून बोलावलं नाही त्यांना.हा अगदीच योगायोग आहे.”

  “रिलॅक्स आई,तुला आता हक्काची रिटायरमेंट मिळालीय ती एन्जॉय कर.थोडं दुखणं सहन करावं लागतंय तुला पण आता किचनमध्ये काय चाललंय ह्याचा विचार सुद्धा करू नकोस.” राज वरदाचा हात हातात घेत म्हणाला.

  संदीप,राज आणि प्राजक्ता तिघेही वरदाची काळजी घेत होते.सारंगशी गप्पा मारून,बसल्या बसल्या गेम्स खेळून तिचं दुखणं नव्वद टक्के कमी झालं.चार दिवसांनी राज बंगलोरला परत गेला पण प्राजक्ता आणि सारंग थांबले होते.वरदा आधाराशिवाय चालायला लागल्यावर प्राजक्ताने बंगलोरला परतायचं ठरवलं.

  “प्राजक्ता,किती सेवा केलीस ग माझी.आणि तुझं ऑफिसचे काम सांभाळून.सून जवळ राहत नसली तरी वेळ पडल्यास धावून येते हे सिद्ध केलंस तू.” वरदाच्या डोळ्यात पाणी आलं.

  “आई,कुटुंब ह्यालाच तर म्हणतात न.आपल्या माणसांना गरज असेल तेव्हा धावून जाणं. आणि आता तुम्ही बंगलोरला या काही दिवस.बाबांबरोबर तुमची पण रिटायरमेंट.” प्राजक्ता हसून म्हणाली.

  “हो ग,नक्की येऊ.” वरदा सारंगला कडेवर घेत  म्हणाली.

  प्राजक्ता आणि सारंग बंगलोरला परत गेले.वरदा आणि संदीपला दोन दिवस घर खायला उठलं.
   “संदीप,तुमची लोणावळ्याची ट्रिप प्लॅन करा.मी आता अगदी ठीक आहे.” वरदा म्हणाली.

   “हो,पण तुझा पुढचा काहीतरी प्रोग्राम होता न?”

   “छे हो,त्या दिवशी रागाच्या भरात,मला पण रिटायरमेंट हवी या नादात उगाच काहीतरी बोलले.पण माझा नवरा,सून,मुलगा,नातू ह्यांनी मला सुखद रिटायरमेंट दिली.आत्तापर्यंत तुम्हाला आणि राजला कधी करायची वेळच आली नाही.मी कधी आजारी असले की आईच सगळं करायच्या.”

  “तू नुसती ऑर्डर केली असतीस की मला आठ दिवस रिटायरमेंट हवीय,तर मी तुझ्या सेवेला हजर झालो असतो.पण त्यासाठी तुला दुखणं सहन करावं लागलं त्याचं वाईट वाटतं.”

  “हो,पण माझी माणसं मला नव्याने कळली आणि त्यापुढे ते दुःख काहीच नाही.आणि आता यापुढे लक्षात राहील हं,तुम्हाला ऑर्डर करायची ते.”वरदा हसतच म्हणाली.

  “जी राणी सरकार.आज्ञा शिरसावंद्य.” संदीप मान झुकवून बोलला.

  संदीपने वरदाचा हात हातात घेऊन थोपटला. तिची ती समाधानाने हसणारी छबी बघून तो तृप्त झाला…..

         ——समाप्त—–

  सौ मधुर कुलकर्णी, पुणे

=====================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

=====================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *