Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® सौ. गीता गजानन गरुड.

विजूताई आज भाची अवनीच्या घरी आल्या होत्या. डोंबिवली स्थानकापासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात तो बंगला बांधला होता. सगळी सुखं हात जोडून उभी होती,अवनीच्या दारात.

सासूसासरे नाशिकला वडिलोपार्जित घरी रहात होते. इथे अवनी, तिचे यजमान,त्यांचा मुलगा सार्थक. अवनी तिथल्याच जवळच्या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती..कॉलेजनंतर एका नामांकीत क्लासमध्ये शिकवायला जाई, ते संध्याकाळी सहाएक वाजेस्तोवर घरी परते. तिचे यजमान हिमांशू हे सरकारी नोकरीत उच्चपदावर कार्यरत होते.

सगळं कसं सोन्याचा वर्ख लावल्यासारखं..बाहेरून बघणाऱ्याला क्षणिक हेवा वाटावा..वाटावं काश! आपण या अवनीच्या जागी असतो! या बंगल्याची मालकीण असतो..चहुबाजूंनी फुलारलेल्या बागेस झारीने पाणी घालत असतो..

अवनीच्या आत्यालाही अवनीचं सम्रुद्ध सासर ऐकून कौतुक वाटायचं. निव्रुत्तीनंतर विजूताई प्रथमच अवनीच्या आग्रहाखातर तिच्या टुमदार बंगल्यात रहायला आल्या होत्या.

लॉनमधला झोपाळा..विशिष्ट अंतर ठेवून लावलेली विविधरंगी गुलाबांची रोपं..माळीकाका बागेची निगराणी करायचे. गेटवर फुललेला कोर्हाटणीचा, कृष्णकमळाचा वेल..त्या फुलांनी गेटच्या गोलाकार कमानीला सजवलं होतं, जणूकाही सलज्ज नवऱ्यामुलीच्या कपाळावरील बाशिंगच.

हिरव्याकंच पानांच्या हिरव्यागार कमानीत ती टवटवीत निळीजांभळी, मखमली फुलं उठून दिसत होती. साळुंक्या, निळेजांभळे,हळदुवे चिमणे पक्षी तर बकुळी,जांभळीच्या फांद्याफांद्यांवर बागडत होते. त्यांची किलबिल कर्णमधुर होती.

एकुणच आल्हाददायक वातावरण होतं. दक्षिण मुंबईत गरजबललेल्या वस्तीत घर असणाऱ्या विजूताईंना भाचीचं हे घर मनापासनं भावलं.

अगदी टेरेसमधे बसावं, समोरच्या टेबलवर कॉफीचा मग असावा नं त्या वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेता घेता आवडत्या गायकाच्या गाण्याच्या दुनियेत हरवून जावं.. जावईबापू हिमांशुही यथोचित मान देत होते.

विजूताईंनी विचार केला, महिनाभर तरी राहू अवनीजवळ. तिलाही आई नाही. आईच्या मायेने काहीतरी गोडधोड करुन घालू. नातवाचे, सार्थकचे लाड करू पण मग त्यांच्या लक्षात आलं, सार्थक पहिल्या दिवशी नमस्कार करून, दोन शब्द बोलून गेला तो मग फिरकलाच नाही खाली. वरच्या खोलीतच असतो की काय! परीक्षा तर संपली त्याची, काय बरं करत असेल वरती बसून एकटाच!

ताराक्का कॉफीचा मग न्यायला आली.

“आत्याबाई कशी झाली काssपी!”

“कॉफी होय. झक्कास.”

“माझ्या हातची काssपी बाईसाहेबांच्या मैतरणींनाबी लै आवडते ताई. येतात नं किटीपार्टीला तवा पयले काssपी चाहिए ताराक्का म्हणतात. लय बरं वाटतं बगा.”

“तुझा नवरा गं?”

“रिक्षा चालिवतो. संधिवाताचा लय तरास तेला मंग वर्षातनं चार,स मह्यनं घरीच बसून, पण स्वभावान लय पिरेमळ. सुपारीच्या खांडाचंबी यसन नाय बगा.”

“आणि मुलं गं.”

“थोरल्या दोघींची लग्न झाली. मधलीच्या पाठीवर सात वर्षांनी मुलगा झालता ताई, आपल्या सार्थकबाबा बरूबरचा. दोघंबी एकाच वयाचं. माझ्या हरीनबी यंदा धावीची परीक्षा दिलेय. रिझल्ट येयपातुर मॉलमधी लागलाय कामाला. तेवढाच फुढल्या शिक्षणाचा खर्च भागवता यील म्हनला.”

“फार लवकर समज आलीय हरीला.”

“परिस्थितीचं चटकं मानसाला बसलं नं आत्याबाई मंग मानसाचं बालपण लै लौकर सोपतं नि मानूस मोठा होतोया.”

“खरंय तुझं म्हणणं.”

“आत्याबाई, माझा हरी रातीची भांडीबी घासतू. सैपाकघरात मला मदत करतू,..देवानेच धाडलाय तेला. बरं तुमास्नी पोवेबिवे..गोळ्या घेयच्या आसतील ना.”

“नाही गं मला कसली गोळी घ्यायची. त्याबाबतीत सुखी आहे मी..बीपी,डायबेटीस अजूनतरी माझ्या वाट्याला आले नाहीत.”

“आमच्या सायबांना हाय की बीपी. लय वरच्या पट्टीत जातो नि बाईसायबांना शुगर. मी सगळं डायट का काय ते सांभाळते तेंच.”

“बरं. हा सार्थक वरती आहे का ग!”

“नाय आत्याबाई सार्थकबाबा सकाळीच जातो कलासला.”

त्यानंंतरचे चारेक दिवस विजूताईंना सार्थक फक्त रात्री जेवणाच्या टेबलावर दिसायचा. त्यांची विचारपूसही करायचा.

का कोण जाणे अवनीच्या त्या भरल्या घरात एक प्रकारचा तणाव विजूताईंना जाणवत होता. बापाचं लेकाशी मोजकंच बोलणं, लेकाचीही त्यावर ठरलेली मोजकी दोनचार शब्दांची भावनेचा ओलावा नसलेली, मारूनमुटकून तोंडातून बाहेर टाकल्यासारखी उत्तरं. विजूताईंच्या आवडीचं केलेलं स्वादिष्ट जेवणही त्या ताणावलेल्या वातावरणात त्यांना रुचकर लागत नव्हतं.

चार दिवसांनी सार्थकचा जन्मदिवस होता. काय बरं घ्यायचं याला ? सगळी सुखं याच्या पुढ्यात हात जोडून उभी..आधुनिक कपडे, खेळाचं साहित्य..सगळं सगळं आहे मग द्यायचं तरी काय याला?

विजूताई असा विचार करत असतानाच सार्थक आला.

” आज्जी, झोपली नाहीस दुपारची?” त्याने आपली आवर्जून चौकशी केली याबद्दल विजूताईंना बरं वाटलं. त्या सुखावल्या.

“तू आज दुपारीच आलास तो!”

” सकाळी पिताश्रींनी जेईईच्या क्लासला घातलय. त्यानंर मी ज्या मित्राकडे दुपारी खेळायला जातो तो बाहेरगावी गेला. त्याच्या मोठ्या भावाचं लग्न आहे. आज्जी, मोठ्ठं किंवा छोटं भावंड असावं एकतरी. तुम्ही कितीजणं होता?’

“आम्ही..एकूण सहाजणं होतो. चार भाऊ नं दोन
बहिणी. “

“जाम धुडगूस घालत होता असाल ना गं तेंव्हा!”

“अरे, काय विचारू नकोस. ठिकरी काय, लगोरी काय..खूप खूप खेळायचो. आमच्या वाड्यात आमची पोरंपोरींच टोळकंच होतं. वाड्याच्या अंगणात कडेला वडाचं झाड होतं. बसायला पार होता. खेळून झालं की तिथे टेकायचो. बैठे खेळ खेळायचो, गाण्याच्या भेंड्या लावायचो..किती मोठ्याने गायचो आम्ही! बुढ्ढी के बालवाला यायचा. गुलाबी तलमसा कापूस घ्यायचो नं वाटूनवाटून खायचो.

एक टिंगटिंग तार वाजवत यायचे. मिरमिरं चिकटसं कायतरी काढायचे. त्यापासून सुंदर मोर बनवून द्यायचे, घड्याळ बनवून द्यायचे.”

“लकी होता गं तुम्ही!”

“तू काय कमी लकी आहेस! हवं ते हवं तेंव्हा मिळतय तुला. आम्ही थोरल्या भावंडांची जुनी पुस्तकं वापरायचो, त्यांनी वापरून आखूड झालेले कपडे आम्हांला मिळायचे.

वर्षाकाठी एखादा नवीन ड्रेस अंगाला लावायला मिळे. तुझा तर वॉर्डरोब सुप्रसिद्ध ब्रँड्सच्या शर्ट्स, ट्राऊजर्सनी सजलाय अगदी. लेपटॉप काय नं आयफोन काय मागशील ते मागशील त्यावेळी.”

“म्हणजे तू वरवरचं पाहिलंस तर. दिसतं तसंच असतं तर..”

“म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला?”

“आज्जी, ती चिमणी बघ या फांदीवरनं त्या फांदीवर.. आधी नं आज्जी तिचं घरटं होतं..माझ्या खिडकीशेजारीच होतं. बारीक ठिपके असणारी तिची अंडी मी निरखून बघायचो.

चिमणी,चिमणा दोघं आळीपाळीने अंड्यांना ऊब द्यायचे. काही दिवसांनी पिल्लं बाहेर आली..लालगुलाबीसी..मग चिमणाचिमणी दोघं उडून जायची, खाऊ आणून पिलांना भरवायची ..पिलांच्या मऊ अंगावर करडुवी पिसं आली,पंखांवर पिसं आली..आणि एके दिवशी ती पिल्लं उडून गेली..पण हे असं माणसांच्या पिल्लांबाबत होत नाही नं आज्जी.

माणसं विशेषतः माझ्या आईबाबांसारखी यशस्वी माणसं आपल्या मुलाला प्रेस्टीज सिम्बॉल म्हणूनच वाढवत असतात. एवढे पर्सेंट पडलेच पाहिजेत..त्यासाठी इतर आवडीनिवडी..सगळ्यावर पाणी..फक्त अभ्यास एके अभ्यास.. टॉपर येण्यासाठी महागडे क्लासेस..त्यांच्या फीस..

अरे पण आम्हांला काय हवंय विचारणार कधी! बरं तोंड उघडलं मुलाने तर त्याला घालूनपाडून बोलायचं..तुला काय कळतय? तुझ्याएवढा मी होतो तेंव्हा असं करायचो तसं करायचो..तुला आयतं गिळायला मिळतय तेंव्हा नखरे सुचताहेत.. असो तू कंटाळशील पण थँक्स आज्जी, खूप दिवसांनी असं मनातलं बोलायला मिळालं त्याबद्दल.”

विजूताई सुन्न झाल्या. खरंच दिसतं तसं नसतं. किती धुमसतय या मुलाच्या मनात! सगळी भौतिक सुखं याच्या पायाशी आईवडील आणून देताहेत पण त्याला नेमकं काय हवंय.. काय खुपतय विचारलय का कधी!

मधे दोन दिवस असेच गेले. विजूताईंचं विचारमंथन चालू होतं. मनात साचलेल्या गोष्टींचा निचरा होणं आवश्यक. ही तिघं जर एकमेकांवर अशीच कुढत राहिली तर..आता त्या बंगल्याची, तिथल्या ऐहिक सुखांचीही विजूताईंना कीव येऊ लागली.

तिन्हीसांज होत आली. विजूताईंनी सांजवात लावली. सार्थकच्या खोलीत डोकावल्या. तो कसलीशी मुव्ही बघत बसला होता.

त्या सार्थकच्या बाजूला बसल्या. सार्थकला मुव्हीत काय चाललय विचारलं. त्यानेही आवडीने सांगितलं.
“सार्थक, उद्या बर्थडे ना रे तुझा. मला तुला काहीतरी द्यायचं आहे पण तुझ्याकडे तर सगळंच आहे. काय देऊ मी तुला?”

“मी मागेन ते देशील? बघ हं.”

“अरे मागून तर बघ. माझ्याच्याने जमणार असेल तर नक्की देईन. तू थोडीच परदेशवारीचं तिकीट मागणारेस!”

“आज्जी,मला न लाडू हवेत. डब्बा भरून.”

“बेसनाचे?”

“नाही गं आज्जी. मुगाच्या पीठाचे तेही गुळ,वेलचीपूड घालून बनवलेले. करशील?”

“हो करेन की.. पण तू हे लाडू कुठे खाल्लेस?”

“माझा मित्र राज, त्याची नानीआज्जी करुन ठेवायची असे लाडू. मी गेलो की मलाही खाऊ घालायची. गेल्यावर्षीच गेली ती तेंव्हापासनं नानीआज्जीची आठवण आली की तिच्या हातचे लाडू आठवतात.”

विजूताईंनी गावठी मुग आणून भाजून घेतले. घरघंटीवरनं दळून आणले नि गुळाचा पाक घालून मस्त गोल गरगरीत लाडू वळले. पितळेचा डबा होता एक माळ्यावर. तो लख्ख घासूनपुसून,उन्हं दाखवून त्यात लाडू रचून ठेवले.

रात्री जेवणाच्या टेबलावर सगळी जमली तेंव्हा सार्थकचे पप्पा म्हणाले,”सार्थक, उद्या वाढदिवस तुझा. यावेळी काय हवंय ते घे. मी पैसे ट्रान्स्फर करेन तुझ्या अकाऊंटवर. मित्रांसोबत पार्टी करणार असशील तर कर पण बाहेरच. घरात धुडगूस नका घालू.”

सकाळी आईपप्पा दोघांनीही सार्थकला बर्थडे विश केलं नि आपापल्या कामाला गेली. विजूताईंनी ताराक्काच्या मदतीने सार्थकसाठी आमरसपुरी बनवली. व्हेज पुलाव केला,कुरडया तळल्या. सार्थकला पाटावर बसवलं. समोर रांगोळी काढली. जेवणाचं ताट ठेवलं. सार्थकला औक्षण केलं व स्वत:च्या हाताने आमरसपुरीचा घास भरवला. सार्थक खूप आवडीने भरपेट जेवला. आज्जीच्या पाया पडला. तिने त्याला लाडवाचा डबा दिला. सार्थकने तिला मिठीच मारली. ती मिठी खूप काही सांगून गेली. एवढं प्रेम दिल्याचे, समजून घेतल्याचे आभार दर्शवणारी ती मिठी..त्या मिठीतली ओल विजूताईंना जाणवली. सार्थकमधलं हळवं मूल त्यांना जाणवलं.

सार्थकचा जेईईचा क्लास चालूच होता. आवड नसली तरी पालकांच्या हट्टापायी तिथे दिवसातले आठ..आठ तास बसावं लागत होतं पण आताशा तो विजूआज्जीशी सगळी सुखदुःख शेअर करू लागला होता.

अशातच दहावीचा निकाल लागला. सार्थकला ब्याण्णव टक्के पडले. सार्थक शाळेतनं पहिला येणार हा पालकांचा आत्मविश्वास त्याने धुळीला मिळवला होता. घरी सुतकी वातावरण होतं.

सार्थकचे पप्पा म्हणाले,”झालं ते झालं. .पण असं बारावीला नाही चालायचं. चांगलं कॉलेज मिळवायचं असेल तर स्पर्धा परीक्षांत स्कोर चांगला हवा..हवं तर अजून एखादी ट्युशन लावू आपण. किती ते पैसे लागुदेत पण ही पुढची दोन वर्ष अभ्यास एके अभ्यास, कळलं.”

सार्थकने तोंड उघडलं,”अरे यार चांगले मार्क्स मिळालेत मला. पुरेसे आहेत तेवढे आणि मला नाही द्यायची जेईई वगैरे. मी कलाशाखेत प्रवेश घ्यायचा निश्चय केलाय.”

आता मात्र सार्थकची आई वस्सकन त्याच्या अंगावर आली,”अरे वेडा काय तू! आठवीपासून जेईई फाऊंडेशन कोर्सला एवढे पैसै ओतले नि आता तू सरळ सांगतोयस कलाशाखेत जाणार म्हणून. फार लाड केले तुझे त्याचंच फळ देतोयस. मुकाट्याने सायन्सला प्रवेश घ्यायचा कळलं.”

सार्थक रागाने जागच्याजागी थरथरत होता. सार्थकचे पप्पा म्हणाले,”आत्या, अहो.माझे वडील शेतमजूर होते. दहावीपर्यंत पायात अडकवायला चपला कसल्या त्या नव्हत्या माझ्याकडे. ठिगळं लावलेल्या पँटी वापरायचो. इच्छा असुनही सायन्सला जाता आलं नाही, फीस परवडत नव्हती. नोकरी करून शिकलो, व्यवसाय केला. हे वैभव उभं केलं.

आरोग्य,संपत्ती, नावलौकिक, पत्नी, मुलगा ही पंचसुखं कमावली मी तरी आतून मी सुखी नाही. माझं ते सहावं सुख खुणावतं मला. आयआयटीतून इंजिनिअर बनता आलं नाही हे शल्य बोथट होता होत नाहीए. आपल्या मुलाकडनं आपली इच्छापूर्ती करून घेणं यात चूक ते काय!”

“जावईबापू, चुकताय तुम्ही. सार्थक तुमचा मुलगा आहे पण तुमचं सहावं सुख,तुमची अपुरी इच्छा पुर्ण करण्यासाठी देवाने पाठवलेलं साधन नव्हे. प्रत्येकाचं आपापलं सहावं सुख, वेगवेगळं असतं. सार्थकचंही नक्कीच वेगळं असणार.

दुर्दैवाने तुम्हाला तुमचं सहावं सुख मिळालं नाही पण म्हणून ते मिळवण्यासाठी सार्थकला बळीचा बकरा बनवलात तर आयुष्यभर तो तुम्हाला माफ करणार नाही. पुढे जाऊन तो त्याच्या मुलावर त्याच्या अपेक्षांची जबाबदारी टाकेल. अपेक्षांचा हा अजगर नात्याच्या बहारदार झाडाला वेढून टाकेल. झाडाच्या खोडातला मायेचा रस प्राशन करून गलेलठ्ठ होईल नं काही कळण्याआधीच नात्याचं झाड उन्मळून पडेल.”

विजूताई एवढं बोलून त्च्या खोलीत निघून गेल्या. सकाळी सार्थक नेहमीप्रमाणे क्लासला जायला निघाला तेंव्हा सार्थकचे वडील पुढे झाले व म्हणाले,”थांब सार्थक. तुला कलाशाखेत जायचंय ना. मग जरूर जा. विजूआत्याने काल आमच्या डोळ्यात अंजन घातलं. आम्ही दोघंही चुकत होतो. आमच्या पुर्ण न झालेल्या इच्छा,आकांक्षा तुझ्यावर लादत होतो.”

पप्पा.. असं म्हणत सार्थक वडिलांकडे झेपावला. बापलेकांनी एकमेकांना अलिंगन दिलं. काही भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते, गरज असते ती स्पर्शाची, मिठीची. बापलेकांतली विरघळत चाललेली अढी पाहून विजूताईंच्या डोळ्यांत आनंदाचं चांदणं लकाकलं.

–समाप्त.

============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *