Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आणि आई कठोर झाली!!

©️®️ सौ. गीता गजानन गरुड

जीजीची सून विशाखा मापटं ओलांडून घरात आली खरी पण देहानेच..वर्ष होत आलं तरी तिचं सासरी सूत जुळत नव्हतं.

जीजीचा मुलगा विद्याधर..गोरागोमटा, सरळ नाकाचा,सरळ चालीचा..मनाजोगती नोकरी मिळाली त्याला नि छोकरीही. त्याच्या प्रेमविवाहाला जीजी,अप्पांनी पाठिंबा दिला. 

जीजीच्या थोरल्या लेकीचं वर्षभरापुर्वी लग्न झालं होतं त्यामुळे घरात जीजी,अप्पा,विशाल व विशाखा..चारजणच असायचे पण विशाखाची घुसमट होत होती. जीजीने कितीही तिच्या मनासारखं वागायचा प्रयत्न केला तरी विशाखा, काही नं काहीतरी कुस काढे.

जीजीला कळतच नव्हतं,हिच्याशी वागावं तरी कसं. जीजीने ती कामावरनं यायच्याआधी पोळ्या करुन ठेवल्या तर मला तव्यावरची ताटात पोळी आवडते म्हणायची..तशी तव्यावरची तिच्या ताटात दिली तरी किती जाड,अर्धकच्ची..अशी नावं ठेवायची.

यात एक चांगली गोष्ट म्हणजे, जीजीच्या लेकीचा,मयुरीचा फोन आला.”आई,तू आज्जी बनणार आहेस. मी येतेय सातव्या महिन्यापासून रहायला..तुझ्या हातचं चांगलचुंगलं खायला. “ये हो. नक्की ये. वाट बघतेय मी.” जीजी डोळ्यात आलेले आनंदाश्रु पदराने निपटीत म्हणाली.

जीजीने फोन अप्पांकडे दिला. गोड बातमी ऐकून अप्पाही खूष झाले. त्यांना आजोबा म्हणणारं छोटं गाठोडं जे येणार होतं,त्यांच्या मिश्या ओढणार होतं, गाल चावणार होतं,केस धरणार होतं.

विशाल घरी आला तसं जीजीने त्याला चहा ओतून दिला.थोड्याच वेळात विशाखाही आली. तिला कडक चहा लागायचा तसा करुन दिला. विशाखालाही मयुरीची गुड न्यूज सांगितली.

“आयुष्यात काही ध्येयं नसली नं की लोकं हे मुलं होऊ देणं,लाड करुन घेणं यातच धन्यता मानतात.” विशाखा कपाच्या कडेवर बोट फिरवत म्हणाली. विशालला प्रथमच तिच्या या वागण्याची चीड आली. त्यालाही मुल हवं होतं, पण विशाखा करिअरच्या नावाखाली गोळ्या घेत राहिलेली. या चढत्या आलेखाच्या वयात तिला मुलाची जबाबदारी नको होती..आणि आता नणंदबाई बाळंतपणासाठी येणार म्हणजे साहजिकच येणारेजाणारे तुमचा नंबर कधी,विचारणार..नणंदबाईचे जास्तीचे लाड होणार..हे सगळं विशाखाला खुपत होतं. ती नीटसं बोलूनही दाखवू शकत नव्हती.

शेवटी सातव्या महिन्यात मयुरी घरी आली. केरळवरुन मुंबईपर्यंतचा  प्रवास म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. मयुरीच्या सासूबाईही तिच्यासोबत आल्या होत्या. विशाखाही वरकरणी का होईना गोडगोड बोलत होती.

विशाल तिला घेऊन मयुरीसाठी साडी घ्यायला गेला तेंव्हाही ती कमी किमतीच्या साड्यांमधलीच साडी..अय्या ही किती छानय.वन्संना शोभून दिसेल म्हणून उचलत होती..शेवटी विशाखाचा रागरंग ओळखणाऱ्या विशालने त्याच्या ताईसाठी तिच्या गव्हाळ रंगाला शोभून दिसेल अशी केशरी रंगाची,गर्द हिरव्या काठाची साडी निवडली,मयुरीच्या सासूसाठीही साडी घेतली..तेंव्हा मयुरी एवढा खर्च का करतोस म्हणत विशालवर फुगली. दोनचार दिवस दोघं एकमेकांशी बोलत नव्हती.

अप्पांनी मयुरीच्या साडीसाठी लागलेले तसेच फुलाफळांच्या वाडीसाठी लागणारे पैसे विशालच्या हातात ठेवले तेंव्हा विशाखाची कळी खुलली.
“कशाला अप्पा. आम्ही का परके आहोत?” ती आपलं बोलायचं म्हणून बोलली पण तोच धागा पकडत विशाल म्हणाला,”बघ ना विशू, अप्पा आपल्याला परके समजतात. आपण याच घरात रहातो तरीदेखील आपला पगारही घरखर्चासाठी घेत नाहीत. ते काही नाही. आजपासून तुझ्या नि माझ्या पगारातले दहा,दहा हजार रुपये अप्पांनी घेतलेच पाहिजेत. आपण त्यांच्या खात्यावर टाकत जाऊ.”

मयुरीला हे सारं पाहून भरुन आलं,”विशाल, तू कुटुंबवत्सल पहिल्यापासनं आहेसच रे. आता तुला जोडीदारीणही तुझ्यासारखीच मिळाली, म्हणजे दुधात साखरच नाही का! एका माहेरवाशिणीला असं नांदतं माहेर बघायला मिळणं हेच सूख असतं बघ.”

“अगदी खरं बोललीस तू मयुरी. आपलं माहेर असं गुण्यागोविंदाने नांदावं हीच प्रत्येक स्त्रीची इच्छा असते.” जीजी वेणी घालण्यासाठी मयुरीच्या माथ्यावर तेल चोपडत म्हणाली.

“इतके छान संस्कार आहेत मयुरीवर म्हणूनच आमच्या घरातही ती सुखाची पखरण करत असते,” मयुरीची सासूबाई तिच्या हनुवटीला बोटं लावत म्हणाली.

“आणि माझेही लाड करते. आता हिला इथे सोडून गेल्यावर तिथे आम्हाला घर ओकंबोकं वाटणार,” मयुरीचा नवरा माधव कसनुसं तोंड करत म्हणाला.

“श्रद्धा और सबुरी का फल मिठा होता है। साईबाबा म्हणून गेलेत नं..विरहात सुख असतं जावईबापू.” जीजी जावयाला म्हणाली.

‘आपण काय म्हणत होतो आणि हे काय उलटंसुलटं झालं,” या विचारात विशाखाने कपाळाला हात लावला. “डोकं दुखतय का विशाखा तुझं, ये इकडे मी देते चेपून..” नुकतीच मयुरीची वेणी घालून तिला रबरबँड लावतालावता जीजी म्हणाली.

विशाखाला चुपचाप जीजीसमोर बसावं लागलं. जीजीच्या बोटांच्या दाबांनी तिच्या न दुखणाऱ्या कपाळालाही अंमळ बरंच वाटलं.

मयुरीचा ओटीभरणाचा सोहळा फार छान संपन्न झाला. सगेसोयरे आले होते..विशाखा सगळ्यांना दाखवण्यासाठी जमेल तेवढी घरातली कामं निपटत होती नि सून तुमची गुणाची आहे हो म्हणत पाहुणेरावळे अप्पा,जीजींजवळ विशाखाची तारीफ करत होते. विशाखाच्या होणाऱ्या कौतुकाने विशालही सुखावत होता.

दिवस पुरे होताच मयुरीने गुटगुटीत गोजिऱ्या बाळाला जन्म दिला. जीजी व मयुरीची सासू दोघीही तिच्या दिमतीला होत्या. कौतुकासाठी का होईना विशाखा त्यांच्या कामातला खारीचा वाटा उचलत होती.

सगळी खबरदारी घेऊनही विशाखाला दिवस गेले. घरातल्या गडबडीत तिचं.स्वत:कडे दुर्लक्ष झालं होतं. तिने विशालवर खूप त्रागा केला. “मला आता बाळ नकोय. मी नाही राहू देणार हे बाळ” ती विशालवर राग काढत होती. विशाल म्हणाला,”आपण डॉक्टरांशी बोलून तर बघू.”

दोघंही डॉक्टरांकडे गेले पण विशाखाला तपासून झाल्यावर डॉक्टर म्हणाल्या,”तुम्ही फार उशिरा आलात. आता हे बाळ तुम्हाला वाढवावंच लागेल.” विशाखा तिथनं बाहेर पडली. अजुनही ती विशालशी बोलत नव्हती.

तिने आईला फोन लावला व रडतच सगळं घडलेलं सांगितलं तर आई तिच्यावरच डाफरली. “विशू, एवढी शिकलीसवरली तू नि वेंधळी कशी गं! आणि राहिलेला गर्भ असा उखडून टाकायला काहीच कसं वाटत नै तुला! तुला ठाऊकयना तू आम्हाला लग्नानंतर बारा वर्षांनी झालीस ते. किती कायकाय सहन केलं होतं मुल होत नाही म्हणून.. सगेसोयरे, ओळखीतले सांगतील  त्या डॉक्टरांकडं जाणं, तपासणी, देवधर्म..आणि तुला हे दान इतक्या सहजासहजी मिळालय तर..”

“अगं पण आई करिअर..माझी प्रमोशन्स.”

“आहे नं सासू करणारी. तिने नाही केलं तर मी आहेच, मलाही काही अडचण आली तर एखादी गरजू मावशी ठेवू बाळ सांभाळायला. हे बघ विशू, तो वरचा जेंव्हा जीव जन्माला घालतो तेंव्हा त्याच्या दाण्यापाण्याचीही सोय करतो. आता शेजारच्या बबीचंच पहा. प्लानिंग प्लानिंग करत सहा वर्ष मुल होऊ दिलं नाही नि आता हवं तेंव्हा मुल होत नाही म्हणून सतरा डॉक्टरांचे उंबरठे झिजवतेय.  तू विशालच्या रागाने माझ्याकडे येणारबिणार असशील तर मीच यांना घेऊन माझ्या माहेरी निघून जाईन.”

आईचं बोलणं ऐकताऐकता विशाखाच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते.”किती रुड बोलते ही. हिच्यापेक्षा जीजीच बरी.” तिने पुटपुटत फोन ठेवला तरी विशालला तिचं बोलणं ऐकू आलं. तो गालातल्या गालात हसला.

घरी आल्यावर गोड बातमी ऐकून सगळीच आनंदली. जीजीने तर विशाखाची मीठमोहरीने दिष्ट काढली. तिच्या आवडीचे गुलाबजाम बनवून खाऊ घातले. मयुरीने विशाखासाठी अगदी नवीन ट्रेंडचा ड्रेस आणला.अप्पांनी तिच्या आवडीची करमळं शोधुनशोधून आणली व तिखटमीठ लावून तिला खायला दिली.

विशाखाला आता हे कौतुक हवंहवंसं वाटू लागलं. पंधराएक दिवसांनी पोटात दुखतय म्हणून परत डॉक्टरकडे गेली असता डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यावी लागेल चौथ्या महिन्यापासनं असं सांगितलं. चार महिने विशाल स्वत: तिला गाडीने सोडायचा, न्यायला यायचा. चौथ्या महिन्यापासनं जीजी तिला सगळं.हातात देऊ लागली..अजिबात कटकट न करता.

विशाखाच्या आईचा मात्र फोन येत नव्हता. ती आईवर रागावली होती..एकुलती एक लेक अशी अवघडल्या अवस्थेत नं आईने एक फोनही करु नये..तिला फार वाईट वाटायचं नि जीजीचं तिचे केस हलक्या हातांनी विंचरणं..अगदी गुंतवणही स्वतः नेऊन टाकणं..यामुळे जीजी तिला आवडू लागली.

सातव्या महिन्यात छोटंसं ओटीभरणं करायचं ठरवलं..विशाखाला वाटलं,’आई, आताही यायची नाही.’ विशालने साडीपासून.सगळी तयारी केली. झोपाळ्याला निशिगंधांचै गजरे लावले..धनुष्यबाण बनवला पण विशाखा खट्टू होती..आणि सकाळीच तिचे आईअण्णा हजर झाले..खूप सारा खाऊ, फुलंफळं घेऊन.

आईने विशुला जवळ घेतलं,”रागावलीस नं. हरकत नाही पण तुला तुझ्या माणसांचं महत्त्व कळावं म्हणून कठोर झाले बघ. लहानपणी तू शाळेत जाताना दंगा करायचीस तेंव्हा कठोर व्हावं लागायचं..आताही या नवीन जगात तू रुळावीस म्हणून आई कठोर झाली बाळा. जीजीकडून मला तुझ्या तब्येतीची नं नाकावरच्या रागावरची बित्तंबातमी मिळत होतीच.”

विशाखाने जीजीकडे पाहिलं. जीजी गोड हसली तशी ‘आई ss गं’ म्हणत विशाखा आईच्या कुशीत शिरली.

(समाप्त)

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

======================================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter