Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पार्वतीकाकू – अगं…हो…हो…किती स्वचछ करशील…बस की..बाकी काहीही म्हण…तुझ्या इतकं साफ काम कुणी करत नाही…

शकुंतलाबाई – ताई…काम आपलं असं हाय..गबाळं काम नाही पटत बा आपल्याला…अजून १० घर हायत …कामासाठी..तेवढं अडवान्स कवा देताय…

पार्वतीकाकू  – अगं आजच घेऊन जा की…!

शकुंतलाबाई – काय नाय…पोरांसाठी करती बाई सगळं काम…शिकून सवरून मोठं केलं की आपलं काम झालं..नाही का ? एकदा का लगीन पाहिलं माझ्या लेकाचं की आनंदानं डोळं मिटलं बाई…

पार्वतीकाकू  – अगं…असं काय अभद्र बोलतेस…

शकुंतलाबाई – नाहीतर काय करू…घरात इन-मिन तीन माणसं…राजुचा बाप दिस-रात नुसता पीत असतो…पिदाड कुठंच…राजूच शिक्षण झालंच आता…परवाच नोकरीसाठी रुजू हो असं लेटर आलंय एकदा का नोकरीला चिकटला ना की मग…लगीन करून मोकळं होईल मी …

इतक्यात शकुंतलाबाईंची नजर पार्वतीकाकूंच्या किचन पाशी जाते आणि एकटक पाहत बसते…कसं सगळं सुटसुटीत…मोकळं, ऐसपैस किचन…शकुंतलाबाईंच्या खूप आधीपासूनच नजरेत भरलेलं असतं…तेव्हापासून…जेव्हापासून शंकुतलाबाई पार्वतीकाकूंकडे कामासाठी रुजू झाल्या होत्या…शंकुतलाबाई इतक्या आशाळभूतपणे सगळ्या किचनवर फक्त नजर फिरवत होत्या…आणि मनोमनी ठरवतही होत्या..काहीही झालं तरी असाच किचन ओटा बनवून घायचा….पण पार्वतीकाकूने ते खूपच सहज हेरले आणि विचारले…

पार्वतीकाकू – काय ग…शकुंतले…एवढं काय पाहतीस…

शकुंतलाबाई – काही नाही हो…काय म्हणतात हो याला…या कपाटांना…लईच मस्त दिसतंय…एक्दम कसं टापटीप  ते पिचरमधल्यासारखं…

पार्वतीकाकू – अगं त्याला मॉड्युलर किचन म्हणतात…यात नाही का खूप प्रकार असतात…स्ट्रेट मॉड्युलर किचन आणि L आकाराचं किचन म्हणजे इंग्लिशमधला L आकार असतो ना…..त्यावर किचन तसा बनवून मिळतो आपल्याला…हवा तसा…!

शकुंतलाबाई – मग…लई खर्च येत असलं…किती येतो बरं खर्च..?

पार्वतीबाई   – अगं…५०,०००/- पासून किंमत चालू आहे तुला कितीपर्यंत बनवून पाहिजे तसं बनवता येईल…

शकुंतलाबाई – एवढे…बापरे लईच किंमत हाय…कमी किमतीत नाही होऊ शकत का काही…

पार्वतीबाई   – अगं…कमीच करून सांगते…

शकुंतलाबाई – बाई ग…माझ्या लेकाचं लग्न होईल त्यात…बाई गं…बाई…निघते मी..कामं मोप पडलीत…जाते बाईसाहेब…

पार्वतीबाई   – अगं…थांब पैसे घेऊन जा की…

शकुंतलाबाई – हा बाई राह्यलंच…द्या जाते मी…

शकुंतलाबाई…मनात मॉड्युलर किचनचा मनसुबा घेऊन येतात…काहीही करून हा विषय राजूजवळ काढायचा असा त्या निश्चयच करतात…राजू नेहमीप्रमाणे घरी असतो…दोन दिवसांनी नोकरीवर रुजू होण्याचं पत्रक आल्याने शर्ट प्रेस करत असतो…तर त्याचे वडील दारू पिऊन आलेले असतात आणि दारात बसून आपल्या बायकोला म्हणजे शकुंतलाबाईंना शिव्या देत असतात …शकुंतलाबाई घरी आल्या-आल्या घटाघट पाणी पितात नेहमीप्रमाणे आपल्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या लेकाशी बोलूं लागतात…

शकुंतलाबाई – राजू…ऐकतो का…?

राजू  – हा…बोल की…आवरलीत का काम..?

शकुंतलाबाई –   हा रे…कामाचं काय एवढं…होतंय आपलं..माझं ऐक तर…

राजू  – हो…हो…काय झालंय पण एवढं… बोल की सावकाश…

शकुंतलाबाई – अरे…राजू… मी आज पार्वतीताईंकडे गेले होते…तिथं ना लईच भारी किचन बनवून घेतलंय त्यांनी…ऐसपैस…मस्त वाटतं…मोकळं आणि सुटसुटीत..राडा पसारा काहीच दिसत नाही…ते काय म्हणतात त्याला ..ते मोडुलर किचन…हा तेच ते..मोडुलर किचन…!

राजू  – अगं…मॉड्युलर किचन म्हणतात..मोडुलर नाही…आणि…आई…झेपणार आहे का आपल्याला ते..एक तर नवीनच नोकरी लागणार मला…असं वस्तूंवर खर्च केला तर..लग्नासाठी पैसे कसे जमवणार..एकतर वडील असेल माझे…काही कमवून पण ठेवलं नाही माझ्यासाठी…तू जे काही कमावतेस सगळं माझा बाप दारू पिऊन बरबाद करतो…तू पैसे देतेस कसे त्यांना.. ??

शकुंतलाबाई – अरे…पोरा मी नाही देत…त्या हातभट्टीवाल्याकडं उधारीचं खातं लावलंय त्यांनी…नको..नको केलंय त्यांनी…

राजू – पाहिलंस…आणि तू म्हतेस मॉड्युलर किचन…बनवायचं नंतर उधारी आपल्यालाच चुकवावी लागणार…चादर बघून हातपाय पसरावे…पैशाचं सोंग आणता येत का ?

साधारण २ दिवसांनी राजू नोकरीसाठी रुजू होतो…एका चांगल्या कंपनीमध्ये कामासाठी रुजू होतो…पगारही चांगला असतो…वर्षभरातच राजू वरिष्ठांची मर्जी सांभाळत त्याचं कंपनीत राजुला बढती मिळते…शकुंतलाबाईंना मात्र सुनबाई घरी आणण्याचे वेध लागलेले असतात म्हणून जोरात वधूसंशोधनाचा कार्यक्रम चाललेला असतो…मग राजुला अनुरूप, शिकलेली विशेष म्हणजे नोकरी करणारी मुलगी शकुंतलाबाई शोधतात…मस्त लग्नाचा बारही उडवतात…लक्ष्मीच्या रूपानं सून घरी येते…अगदी आपल्या नावाप्रमाणेच लक्ष्मीअसते…शकुंतलाबाई आणि लक्ष्मी दोघीही अगदी मैत्रिणीसारख्या नांदत असतात..लक्ष्मी अगदी स्वतःच्या आईप्रमाणे शकुंतलाबाईंची आणि सगळ्यांची काळजी घेत असते..काय हवं नको ते विचारत असते…तेही स्वतःच ऑफिस सांभाळून बघत असते सगळं…म्हणून शकुंतलाबाईंना आपल्या सुनेचं कौतुकच वाटत असते.  म्हणून कुठं ठेऊ कुठं नको करत असतात…सगळ्या घराची जबाबदारी एकट्या मुलावर आणि सुनेवर येऊ नये म्हणून आपलं घरोघरी जाऊन धुणी-भांड्याचे काम त्या सून आली तरीही करत असतात…तेवढंच आपल्याकडून सुनबाईंना संसारासाठी हातभार…

पार्वतीबाई  – अगं…शकुंतला..नको न करुस आता काम…कर की आराम…

शकुंतलाबाई – अहो ताई…लेकरू राबतंय घरासाठी…असू देत तेवढी माझी मदत…

पार्वतीबाई  – अगं…केलंस की एवढं…लहानच मोठं केलं..लग्न केलं त्याचं…दोनाचे चार हात केलेस की तू…अजून किती राबणार…

शकुंतलाबाई – ताईसाहेब…खूपच जिद्दी आहे माझी सून..मला कधी उलटून बोलली नाही ती…सगळ्यांची काळजी घेते म्हणून पोटात तुटतं माझ्या…किती दिवस खोलपटात ठेवणार मी तिला…काम चालूच राहणार माझं…त्यात बदल होणार नाही…सुनेचंही मी ऐकत नाही ग याबाबतीत…तीही हेच म्हणते मला…काम बंद करा…मी शाप ऐकत नाही तिचबी..

पार्वतीबाई  – तू काही ऐकायची नाहीस..!

शकुंतलाबाई आपलं काम झटपट आवरून जातात….जाता-जाता परत एकदा त्या पूर्ण किचनवर नजर फिरवतात…मनाशी काहीतरी ठरवतातच त्या…घरी आल्या-आल्या पाणी पितात…शनिवार असल्याने लक्ष्मी घरी लवकर येणार असते म्हणून…अगदी चातक पक्षाप्रमाणे शकुंतलाबाई आपल्या सुनेची वाट पाहत बसलेल्या असतात …काही मिनिटांनी सुनबाई येतात शकुंतलाबाई लगेच ताट वाढायला घेतात आणि आपल्या सुनेशी थोड्या इकडच्या-तिकडच्या गप्पा मारतात..मग किचनसंदर्भात बोलू लागतात…

शकुंतलाबाई – अगं..लक्ष्मी ते तू…तो फोन वापरते की नाही ग…त्यात सगळं दिसत..

लक्ष्मी – हा…आई त्याला स्मार्टफोन म्हणतात…काही बघायचं का तुम्हाला..

शकुंतलाबाई – हा…अगं…ते मोडुलर किचन का काय ते बघ बरं…

लक्ष्मी – [हसून] आई…त्याला मॉड्युलर किचन म्हणतात…मस्त असतं हा ते पण…

शकुंतलाबाई – हा..तेच…ते…दाखव बरं मला…

लक्ष्मी आपल्या सासूला मॉड्युलर किचनबद्दल सगळं काही दाखवते…

शकुंतलाबाई – हा…अगं असच आहे सगळं…किती मस्त वाटतं ना सुटसुटीत…कसला पसारा नाही नि काही नाही..अगं मी कामाला जाते ना तिथं सगळ्या बायकांच्या घरात असंच आहे सगळं…

लक्ष्मी  – म्हणूनच तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे…

शकुंतलाबाई – हा बाई…मी तुला स्वयंपाक करायला साधा नीट ओटा पण करू शकले नाही…लई कसतरी वाटतं बग मला तुला असं..एवढ्या कमी जागेत फक्त शेगडीवर स्वयंपाक करावा लागतो…

लक्ष्मी  – आई…अहो त्यात काय एवढं…जमतंय मला…काही त्रास होत नाहीय…

बोलता-बोलता मस्त सासू-सुनेचे जेवण होते…लक्ष्मी आपल्या सासूच्या मनातलं चटकन ओळखून घेते..आणि तेव्हापसूनच मेहनत घ्यायला आपल्या नवऱ्याबरोबर उभी राहते…लक्ष्मी एका कोचिंग क्लास मध्ये पार्ट टाइम लेकचरर म्हणून जॉईन होते…त्या लेक्चररशिप मधून जे काही पैसे येतात ते ती तसेच जमा करून ठेवते आणि तेच पैसे खास मॉड्युलर किचन बनवण्यासाठी जपून ठेवते…आणि सरकारी नोकर असल्याने बँकेत लोनसाठी अर्ज करते…सरकारी नोकर असल्याने लोन लगेच पास होतं…मग ऑफिसच्या जवळच एका चांगल्या ठिकाणी २ बी.एच.के. बुक करते नोकरीतली स्थिती हळू-हळू सुधारते…राजुही चांगल्या पोस्ट वर जातो..काम वाढतं…मानधनही वाढत…मग फ्लॅट साठी एवढी अडचण येत नाही…साधारण एका वर्षानंतर लक्ष्मी आणि राजू नव्या जागेत बस्तान बसवण्यासाठी विचार करतात… 

नवीन घरात पहिले साधाच किचन ओटा असतो पण सासूबाईंची मनातली इच्छा सत्यात उतरवायची असा कयास लक्ष्मीने आधीच धरलेला असतो म्हणून एका दिवस आपल्या सासूबाईंना नवीन घरी बोलावण्याचा बेत आखते…पण पुढे मात्र मोठ्या दिव्याला सामोरं जावं लागत…कारण शकुंतलाबाईंचा नवरा म्हणजेच आत्माराम दारूच्या अतिसेवनाने मरण पावतो…अचानक आलेल्या संकटाने शकुंतलाबाई कोलमडून जातात…तरीही खचून न जाता आपल्या मुलासाठी आणि सुनेसाठी परत जिद्दीनं उभ्या राहतात…आपला नवरा गेला या विरहात त्या राहिल्या नाहीत कारण… नवरा हा असूनही नसल्यासारखाच होता…जो दारूच्या आहारी आधीपासूनच होता…त्याची काय आठवण ठेवायची असं शकुंतलाबाई आल्या-गेलेल्याना सांगत होत्या…दिवसकार्य झाले…वर्षभर सुतक पाळूनही झाले…मग मात्र लक्ष्मी आणि राजुने नवीन घरात शिफ्ट होण्याचं मत आपल्या आईला सांगितलं… 

राजू – आई…अगं फ्लॅट बुक करून ठेवलाय….पण जायला मुहूर्तही सापडत नाहीय…श्राद्ध तर झालं…आता कसली वाट पाहतोय आपण…

शकुंतलाबाई – पोरा…माझा काय पाय निघत नाही इथून…तुम्ही जावा…किती तुझा बाप मला शिव्या घालायचा पण नाही म्हटलं तर माझा मालकच होता ना तो…नवराच होता ना…मी काही येत नाही बाबा…एवढंच काय ते माझ्या मेलीचं ऐकाल ना….

लक्ष्मी – आई…तुम्हाला सोडून जाउ का आम्ही…तुम्ही एवढा हट्ट करू नका…तुम्ही हट्टी असाल तर मीही हट्टी आहे…राजू आईंना कसं घेऊन यायचं ते तू माझ्यावर सोपव…त्याआधी सगळी साफसफाई आणि विधी करावे लागतील…

राजू  – ठीक आहे…

ठरवल्याप्रमाणे लक्ष्मी आणि राजू दोघेही नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट होण्यासाठी सामानाची बांधाबांध करतात…आठ दिवसात साफसफाई उरकून नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी  दूध उतू घालण्याचा विधी उरकून घेतात. त्यानंतर रीतसर गृहप्रवेशही होतो…मग मात्र आपल्या सासूबाई इकडे आल्यानंतरच वास्तुशांती करायची असं लक्ष्मी ठरवते…पण आठही दिवस लक्ष्मी शकुंतलाबाईंची काळजी घेण्यास कुठलीही कुचराई करत नाही…मग बोलता-बोलता एका दिवसासाठी नवीन फ्लॅट वर जेवण्यासाठी बोलावतात…तिथेच जेवणाचा साग्रसंगीत बेत आखतात…पूर्ण दिवस तिथेच घालवायचं ठरवतात…आणि फ्लॅट वर गेल्यावर….

शकुंतलाबाई – बाई..ग…डोळ्याचं पारणं फिटलं बघ माझ्या…लईच भारी दिसतंय…अगदी पिचरवानी दिसतंय टीव्हीतल्या सारखं….

लक्ष्मी  – आवडलं ना तुम्हाला…बघा बरं…झालं ना तुमच्या मनासारखं…कुठे काहीही पसारा दिसत नाहीय…

शकुंतलाबाई – खरंच बाई…सगळं कसं…ठेपशीर आहे…मला वाटलं या जन्मात काही मला असं घरात दिसणार नाही…हौस पुरी केलीस बया माझी तू…

लक्ष्मी – आता तरी याल ना आई तुम्ही…आमच्यासोबत राहायला…हे सगळं खुणावतंय तुम्हाला…आम्ही करू इथून पुढची तुमची सगळी स्वप्न साकार…

शकुंतलाबाई – गुणाची माझी लेक ती…[तेव्हड्यात राजू येतो आणि सगळं ऐकतो]

राजू  – लक्ष्मी…अरे वाह…आईला लगेचच तयार केलं तू…इकडे राहायला यायला…

लक्ष्मी – राजू…मर-मर केली रे त्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी…आता आपण त्यांची स्वप्न साकार करायची…या मॉड्युलर किचनसारखं…

शकुंतलाबाई- हा…एवढ्यानं नाही चालणार…मला अजून हवंय तुझ्याकडून काहीतरी…

लक्ष्मी  – [गोंधळून जाते आणि कावरी-बावरी होते] काय पाहिजे आई…तुम्ही मागून तर पहा…

शकुंतलाबाई – एक नातू… नाहीतर एक…नातं तरी द्या की आम्हाला..

लक्ष्मी लाजून  – आई…तुमचे आशीर्वाद असतील तर…तेही देईल तुम्हाला..

आपल्या माणसाच्या मनातलं अचूक ओळखलंत की नाती अजून फुलतात…यातच खरी गंमत असते संसाराची. 

====================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories