Ritbhatmarathi

Search
Close this search box.

दमयंती आपल्या सासरी जाऊन आता जवळ-जवळ वर्ष होत आलं होत…दमयंतीला आपल्या माहेरी असताना टीव्ही पाहण्याचे प्रचंड वेड…दिवस-रात्र टीव्ही…टीव्ही…आणि फक्त टीव्ही…सकाळ झाली की दमयंतीचा टीव्ही चालू होत असे…त्यातल्या त्यात सिनेमा आणि गाणी आवडता विषय…पण रटाळ सिरीयल पाहायचा मात्र कंटाळा…उमेश म्हणजे दमयंतीचा नवरा एक चारटेड अकाउंटंट असल्याने दिवसभर ऑफिसमध्ये असे…कामाचा व्याप खूप असल्याने घरच्या कुरबुरीत फारच कमी लक्ष देत असे…माहेरी वेड्यासारखा टीव्ही पाहणारी दमयंती सासरी आल्यावर टीव्ही पाहण्याच्या बाबतीत खूपच मागे पडू लागली…मागे पडली म्हण्यांपेक्षा टीव्ही पाहण्यातला रस कमी घेऊ लागली…दमयंती जरी टीव्ही पाहत नसली तरी याबाबतीत सासूबाई माघार घेणाऱ्या नव्हत्या…कारण सासूबाईही अगदी टीव्ही मधल्या पात्रात सरमिसळून टीव्ही पाहत असे…सासूबाई कमलताई आणि सासरे सुधाकरराव असेच टीव्ही पाहत बसले होते…दमयंती टीव्ही पाहण्यासाठी हॉलमध्ये क्वचितच येत असे…असं खूप वेळा झालं आणि हि गोष्ट सासरे सुधाकरराव यांना खटकली…सासूबाई लगेच सुनबाईंच्या वागण्यावर तोंडसुख घेऊ लागल्या आणि म्हणाल्या-

कमलताई – दमयंती…अगं माणसांमध्ये राहत जावं जरा…इथे हॉल मध्ये येऊन टीव्ही पाहावा…टीव्हीमधलं चांगलाच घ्यावं…वाईट गोष्टी घेऊ नये…

सुधाकरराव – सुनबाई…तिच्या म्हण्याचा चुकीचा अर्थ नको घेऊस हा…तिला फक्त इथे हॉल मध्ये येऊन बस असं सुचवायचं तुला…[सासरे सारवा-साराव करतात]

दमयंती   – पप्पा…तसं नाहीय काही…पण मला सिरिअल्स पाहायला आवडत नाही…आणि स्वयंपाकघरात काम असत म्हणून मला टीव्ही पाहायला उसंतच नसते…

सुधाकरराव – बोला…सुनबाई…मग आज काय बेत आहे जेवणाचा…? हिच्या हातच खाऊन-खाऊन कंटाळा आलाय…

कमलताई  – [खोचकपणे म्हणतात] काय हो…आधी तर माझ्या स्वयंपाकाला अमृताची चव आहे असं म्हणायचात..आता काय झालं…बरोबर आहे नवडतीचं मीठ अळणीचं…आता काहीतरीच वाटत असेल माझा स्वयंपाक…

दमयंती    – नाही आई…उलट सगळा स्वयंपाक तुम्हीच तर शिकवलाय मला…भाज्यांना तर काय अप्रतिम चव असते आई तुमच्या…मला नाही बाबा जमत एवढं…[सासूबाईंना हरभऱ्याच्या झाडावर उगाच चढवून देते]

कमलताई – [गालातल्या गालात हसून] हो ना…[लगेच सासूच्या भूमिकेत येतात] बरं..बरं…काय स्वयंपाक केलाय ते तरी सांग की…

दमयंती   – आई…ते वांग्याची भाजी केलीय…मटार पॅटिसही केलेत…सोबत कोशिंबीरही आहेच…गोडाचं काय करावं म्हणून…आज दुपारीच सुतारफेणी केलीय मी…

सुधाकरराव – अरे…व्हा…म्हणजे आज पोटोबा मस्त होणार…बघ कमल तू कधी सुतारफेणी करून नाही घातलीस आम्हाला…मला तर गोडं खूपच आवडतं…

कमलताई  – अहो…जरा जपून गोडं खावं माणसाने…मधुमेह होईल…

सुधाकरराव  – बघ…मी सगळ्यांशी गोडं बोलतो म्हणून मला मधुमेह नाही झाला…तू कधी कुणाशी गोडं बोललीस…म्हणून देवाने तुलाच मधुमेह दिला…

कमलताई – उपरोधिक बोलणे पुरे झाले…चल ग जेवायला पान घे…मुहूर्त बघणारेस त्यासाठी…

दमयंतीचे सासू आणि सासरे  मस्तपैकी जेवले….उमेशला यायला अवकाश असल्याने दमयंती त्याच्यासाठी जेवणाची थांबली..सासू नेहमीप्रमाणे टीव्ही पाहत होत्या…त्या टीव्ही पाहण्यात इतक्या गढून गेल्या होत्या की…आपला लेक उमेश केव्हा आला हे त्यांना कळलंही नाही…मधेच हसत होत्या…तर मधेच भुवया उंच करून आपले चेहऱ्यावरचे भाव बदलत होत्या…टीव्हीमध्ये रोमँटिक सिन आला तर मधेच लाजत होत्या…उमेश घरात आला…दमयंतीने त्याला पाणी दिले…टिफिन बॅग मधून काढून ठेवला…उमेश फ्रेश होऊन येईपर्यंत दोघांचीही ताट वाढली…दोघेही मस्तपैकी गप्पा मारत जेवण करत होते…

उमेश   – काय ग दमयंती…हे काय मस्त लागतंय…नवीनच मेनू दिसतोय…

दमयंती – हा…अहो…याला सुतारफेणी म्हणतात…कधी नव्हे ती आईसारखी बनवलीय…

उमेश   – आईसारखी…अरे बाप रे…तिनं तर कधी एवढी चांगली बनवलेली मला आठवत नाहीय…

दमयंती – अहो…तुमच्या आईंबद्दल नाही म्हणत आहे…माझ्या आईबद्दल बोलतीय…तिनंच शिकवलीय मला… आणि सासूबाईंना तर स्वयंपाक घर नकोच आहे की…कधी तरी त्यांच्या हातचही आवडेल मला खाल्लेलं…

उमेश  – दमयंती अगं…तिला आधीपासूनच स्वयंपाकात म्हणावा तितका रस नाहीय..

दमयंती – मग काय आवडतं त्यांना…टीव्ही पाहायला…[हसून]

उमेश   – तो तर सगळ्याच बायकांचं आवडतं मनोरंजनाचं साधन आहे ग…तू नव्हतीस का टीव्ही पाहत..

दमयंती – मीही पाहायचे…पण आईंइतका नव्हते पाहत…त्यातल्या त्यात त्या रटाळ मालिका पाहायला मला कधीच आवडलं नाही हा…

उमेश   – म्हणूनच तू इथे टीव्ही जास्त पाहत नाही… पण माझ्या सासूबाईंनी मला सांगितलंय तुझ्याबद्दल…तू किती वेळ टीव्ही पाहायचीस ते..

दमयंती – मी टीव्ही जरी पाहत असले ना तरीही…स्वयंपाक चुकवला नाही कधी…

उमेश   – ह्म्म्म…तेवढं मात्र वाखाणण्यासारखा आहे तुझ्याबद्दल…बरं एक पोळी वाढ ना…भाजी खूप मस्त झालीय..

दमयंती – हम्म…

दोघांचेही जेवण होते…दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा-रांगोळी…देवपूजेची तयारी असं सगळं करून ठेवते…उमेशला डबा द्यायला लागायचा म्हणून तीही तयारी एकटीच करत असे…सासूबाई उठून फक्त पूजा करत असे…तोही टीव्ही लावूनच कारण आस्था नावाच चॅनेल खास कीर्तनासाठी असल्याने सकाळी कीर्तनाने सुरुवात होत असे…पूजा होण्याच्या आधी चहा सासूबाईंना पाहिजे असे म्हणून सासूबाई चहा साठी स्वयंपाकघरात आल्या तेव्हा…सुधाकररावही चहा घेत होते…कमलताई म्हणाल्या…

कमलताई – बाई ग…माझं कुठं एवढं नशीब गोडं चहा प्यायचं…

सुधाकरराव – मग…नशीबच लागत त्याला…मी नशीबवान आहे बाबा खूप…

दमयंती    – आई…अहो मग बिनसाखरेचा करते की चहा…नाहीतरी रोज तोच घेता तुम्ही….

कमलताई – बरं ..बरं …दे बिनसाखरेचा चहा…म्हणजे पूजा आटोपून कालच्या सिरिअलचा भाग बघायला मी मोकळी…आणि बरं…का दमयंती…तुही बस आज सिरीयल पाहायला…तुझ्यासाठी खास भाग आहे…ती सून कशी सासूची सेवा करते…म्हणता ताकभात ओळखणारी असते…कसा सासूचा शब्द जपते…बघच तू…

दमयंती    – हो का…पाहायलाच हवा कालचा एपिसोड आज…निदान सासू कशी आहे ते तरी पाहेंन मी…

सुधाकरराव – अरे…वाह…सुनबाई…पहिल्यांदा माझ्या मनातलं बोललीस ..

आज दमयंतीला काहीही करून सासूबाईंबरोबर टीव्ही पाहायचाच होता…म्हणून मनाशी ठरवलं काहीही करून सासूबाईंचं टीव्ही च भूत लवकरच उतरायला पाहिजे म्हणून झटपट आपली काम आटोपते आणि आपल्या सासूबाईंबरोबर टीव्ही पाहायला बसते…सासूबाई आपल्या नेहमीच्या शैलीत टीव्ही पाहत असतात आणि दमयंतीला सांगत असतात…आणि दमयंतीही काट्याने काटा कसा काढावा या पूर्ण तयारीत टीव्ही पाहायला बसते

कमलताई – बघ…ती तेजा कसा आपल्या सासूचा शब्द पाळते…आज्ञेत कसं राहायचं ते शिकून घे…तू पाळशील का माझा शब्द…

दमयंती   – म्हणजे काय आई…त्यासाठीच तर मी आलीय ना…अरे देवा…आई पण…त्या सिरिअलमधल्या तेजाच्या सासूबाई तर खूपच श्रीमंत दिसतायत…त्यांच्या हाताखाली काम करायला किती नोकर-चाकर आहेत…तुम्हीही घरात एक तरी नोकर ठेवा ना त्यांच्यासारखा…आणि बघा ना त्या तर…तेजाला किचनमध्ये केवढी मदत करतात…शिवाय कधीच कंटाळा नाही करत आपल्या नवऱ्याचा…तुम्हीही पपांशी चांगलं बोलाल..

कमलताई – हो…हो…का नाही बोलणार…चांगलं बोलले म्हणून तर संसार केलाय ना मी… …दमयंती…दुधाचा वास येतोय…गॅस चालू ठेवलास की काय…

दमयंती  – हो हो…आलेच मी…गॅस बंद करून…

कमलताई – थांब ग…मीच बंद करते…तू बघ पुढे सिरीयल आणि मला सांग काय होतंय ते पुढे…

आपलं काम सासूबाईंनी केलं हे पाहून दमयंतीला खूपच आनंद झाला म्हणून इथून पुढे सासूबाईंना कसं टीव्हीपासून लांब ठेवायचं याचा बेत मनोमनी आखत असते…नेहमीप्रमाणे सकाळची सगळी काम आटोपून दमयंती दुपारच्या जेवणाची तयारी करत असते…दमयंती तिघांसाठी ताट वाढून घेते…विशेष म्हणजे टीव्ही सुरु करते पहिला…!

दमयंती – आई…अहो बघा ना…किती पुढे-पुढे करते आपल्या सासवांच्या…

कमलताई – कुठली सिरीयल लावलीस…?

दमयंती   – होणार सून मी ह्या घरची….काय मस्त आहे ना जान्हवी…तो श्री केवढा प्रेम करतो तिच्यावर…

कमलताई – हो ना….सासवांचं किती करते…ते पहा पाहिलं…एक नाही तर…सहा सासवा आहेत तिला…

दमयंती   – हो ना…पण सहाही सासूबाईंना आता आपल्या पायावर उभी करतीय ती…हे विशेष आहे…आई…तुम्हीही घरातूनच काहीतरी कराल…नाही म्हणजे तुमची तयारी असेल तरच करा…माझी काही जबरदस्ती नाहीय…

कमलताई – अगं बाई…पण मी मेली करणार तरी काय…असं…?

दमयंती   – आई…काही नाही…यांच्याकडून मी असं ऐकलंय तुम्ही मस्त थालीपीठाचं पीठ बनवता…तसंच पीठ बनवून ठेवायचं…त्यानंतर ते विकलं जाईल…तसंही आपण धान्य आपण आपल्या गावाकडून भरतो मग …करूयात की जास्त खर्च पण नाही होणार…त्यात आपण मूग,मटकी,ज्वारी,बाजरी,तांदूळ,हरभरा डाळ,नाचणी  अशी पीठं एकत्र करूयात मग ती विकूयात…हो ना…

कमलताई – कल्पना वाईट नाहीय…धान्याचं तू ठरवलंस…सगळ्यात आधी ते आपण भाजून घ्यायचं…मग त्यात ओवा,जिरे,हावरी तीळ असं प्रमाणात टाकून द्यायचं…त्यानंतर पॅक करून भरून ठेवायचं…

दमयंती  – आई…सप्तधान्य थालीपीठ भाजणीअसं नाव देउयात चालेन का…?

कमलताई – हो चालेन की…

दमयंती  – मग…पहा…तुम्ही सुद्धा त्या सिरीयल मधल्या जान्हवीच्या सासूबाईंसारख्या मोठ्या व्हाल…त्यांचं कसं गोखले गृहउद्योग असं नाव आहे बिझनेसला…अगदी तसंच…आपलं आडनाव देऊयात आपल्या गृहउद्योगाला…

कमलताई – हो ना…चांगलीच शक्कल लढवलीस तू हा…

अशा गप्पा मारत-मारत तिघांचीही जेवणं उरकतात…दमयंतीला मात्र खूप आनंदाने भरून येत होतं कारण टीव्ही च व्यसन कायमचं सुटणार ही गोष्टच किती आशावादी होती घरासाठी…व्यसन सुटणं ही गोष्ट खूप महत्वाची असते प्रत्येक जबाबदार व्यक्तीसाठी मग ते व्यसन कुठलंही असोत…दमयंती आपलं सगळा मनसुबा नवरोबा म्हणजेच उमेशला सांगते…तेव्हा उमेशची रिऍक्शन पाहण्यासारखी असते…एक दिवस उमेशचं ताट करत असताना…दमयंतीच कौतुक उमेश करतो-

उमेश   – दमयंती…तू  खरंच खूप ग्रेट आहेस…आईचं हा हे व्यसन सुटावं म्हणून आम्ही खूप तिच्या मागे लागायचो..पण आम्हालाच तिच्या तालावर नाचावं लागायचं…जे आम्हाला जमलं नाही ते तू काही महिन्यातच करून दाखवलं…

दमयंती – अरे मी फक्त…त्यांच्या कलेनं घेऊन सांगितलं…विशेष म्हणजे त्यांना ते पटलं…तसंही सिरिअल्स पाहणं वाईट नाहीय…पाहावी सिरीयल पण….अगदी समरसून…एकाग्र होऊन नाही पाहू…आईचे हावभाव पाहते मी नेहमी…ती हिरोईन जशी करते ना तसंच त्या पण करतात…पण त्यांना हे लक्षात येत नाही की त्या अभिनेत्रीला त्याच कामाचे पैसे मिळत असतात…आईनं लाजून काय होणारे…हा आता पपांना पाहून लाजल्या तर गोष्ट वेगळी आहे…[इतक्यात उमेश रोमँटिक होऊन]

उमेश – दमू…तू नाही का लाजत मला…घे आज माझ्या हातचा एक घास खाऊन बघ…

दमयंती – इश्श…काहीही काय…तू जेवणं कर ना..

उमेश    – तू खाल्ल्याशिवाय मी नाही जेवणार…

दमयंती – तू काही ऐकायचा नाहीस…दे भरव…!

असं…दोघेही जेवणं करतात…दमयंतीला नेहमीपेक्षा खूपच लवकर झोप लागते….कारण सगळे विचारचक्र थांबतात…दुसऱ्या दिवशी सासूबाई लवकर उठून थालीपीठ करण्यासाठी लागणार धान्य काढून  ठेवतात धान्य भाजून त्यात ओवा,जिरे,हावरी तीळ घालून दळण्यासाठी तयार करून ठेवतात…मग आपली पूजा आटोपून दमयंतीला कामात मदत करू लागतात…हा बदल पाहून सुधाकरराव तर चकीत होऊन पाहतच बसतात आणि कमलबाईंना काहीतरी सुचवतात-

सुधाकरराव – अगं…कमल…एक बाई ठेऊन दे बरं कामासाठी…तू तुझ्या नवीन कामात असशील…सुनबाई घरातलं पाहतील…मग वरच्या कामाला बाई लावून दे..

कमलताई – हो ना…ते पाहावंच लागेल…समोरच्या बंगल्यातल्या भोरे वहिनींशी बोलते त्यांच्याकडे येते त्या बाईला विचारुयात कामाचं…

पहिल्यांदाच आपल्या नवऱ्याशी न भांडता त्या बोलत होत्या…म्हणून उमेश व त्याचे बाबा अचंबित असतात….संध्याकाळी पीठं पॅक करणं,पिठाचे वजन करणं अशी काम होतात…दुसऱ्याच दिवशी ते पीठं जवळ असलेल्याना विकलं जात…तीन महिन्यातच थालीपीठ जवळपास असलेल्या गिऱ्हाईकांच्या पसंतीस उतरतं…वर्षभरात सप्तधान्य थालीपीठ भाजणीविक्री याच्या खूप साऱ्या ऑर्डर्स येऊ लागतात…आणि आपल्या सासूबाई टीव्ही पाहण्यापेक्षा जास्त एक व्यवसायिका म्हणून नावारूपाला आल्या याचा आनंद सगळ्याना होतो…उमेश आपल्या पत्नीवर आणि सुधाकरराव आपल्या सुनेवर स्तुतीसुमने जणू उधळत असतात.                   

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories