Ritbhatmarathi

Search
Close this search box.

नेहमीप्रमाणे सकाळची लगबग वीणाताई खूपच लगबगीने नेहमीची काम आटोपून श्राद्धाची कामं आवरायला घेतात कैलासही सांगितल्याप्रमाणे आपली बायको अपेक्षा हिला घेऊन येतो…येताना थोडा वाद झाला त्यांचा…

अपेक्षा – काय हो नसती उठाठेव…काय गरज आहे मला तिथे घेऊन जायची…एक तर आपल्या घरात सगळं एकटी मीच करते…सवाष्ण नाहीय त्यांच्या घरात तर मी काय करू…घरून शिणून भागून यायचं आणि तिथेही दमायचं…सुख म्हणून नशिबात नाही माझ्या…

कैलास – बडबड करू नकोस ग…जरा शांतपणे राहत जा की…निम्मी अर्धी शक्ती त्यातच वाया घालवतेस तू…

अपेक्षा – अहो…तुम्ही असंच म्हणा…दिवसभर घाण्याला जुंपत असता तुम्ही सत्यजितभाऊजींबरोबर…त्याच काही मिळत का तुम्हाला…

कैलास – हे बघ खूप बोललीस ह्यात काय एक्स्ट्रा इनकम मागायचं…चांगला ४० हजार पगार आहे मला…काय कमी पडत ग तुला…

अपेक्षा – राहू द्यात…एकतर मी नोकरी करते तेही खटकत तुम्हाला…पुरुषी अहंकार आड येतो ना तुमचा…या भाड्याच्या घरात किती दिवस राहायचं…

कैलास – भाड्याचं तर भाड्याचं…तुला त्याची किंमत नाहीय…मी खस्ता खातो तिथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करायला पण सगळं फोल ठरतंय तुझ्या या अशा वागण्याने…तुला फक्त सवाष्ण म्हणून बोलावलंय पण त्याचा तरी मान ठेव की निदान…तुला माझाच मान नाही राखता येत तर स्वतःच्या सवाष्ण असण्याचं काय अप्रूप असणार आहे…चल उतर खाली आलं मुधोळकरांचं घर…आणि तिथे जाऊन निदान स्वतःची आणि माझी शोभा करू नका म्हणजे झालं…

अपेक्षा एकदम तणतणत गाडीवरून उतरते आणि बडबड करत मुधोळकरांच्या प्रवेशद्वारात जाते…घर नीटनेटकं आणि स्वछ बघताच अपेक्षांची बडबड कमी होते…वीणाताई गॅलरीमधुन पाहताच असतात त्यांच्या लक्षात येत नक्की काहीतरी बिनसलंय…अपेक्षा दिवाणखान्यात बसलेली असते…वीणाताई दिवाणखान्यात येताच अपेक्षा उठून उभी राहते…वीणाताई म्हणतात…वीणाताई – अगं…उभी काय ग बस की…मला माहितीय कैलासशी भांडलीयस ना…

अपेक्षा – नाही काकू…तसं काही नाही…

वीणाताई – तू काही सांगू नकोस हा…अगं चार पावसाळे जास्त पाहिलेत मी…कैलासचा स्वभाव आहे तसा तापड मग होत असेल काही ना काही घरात…कामावरून…

अपेक्षा – कामावरून नाही हो…हे ना फक्त शब्दाने बोलत असतात…घरात काडीची मदत नसते कुणाची…मला काय म्हणायचंय फक्त तोंडाने बोलू नका हो…जरा काहीतरी मदत करून दाखवा ना…

वीणाताई – सगळे पुरुष सारखेच असतात…त्यांना बायको म्हणजे काय हे उमगतच नाही लवकर…यात अर्ध आयुष्य निघून जात बायकांचं…आपण मेले मर मर करतो त्यांच्यासाठी पण त्याच काही नसत ग यांना…

वीणाताईंचे म्हणे ऐकून अपेक्षाला जरा बरे वाटते…कारण त्या पूर्ण त्यावेळी तिच्याच बाजूने बोलत होत्या..बरोबर आहे बायकांना आपल्या बाजूने बोलणार कुणी असलं ना की मॉरल सपोर्ट भेटतो…थोडंसं बोलणं झाल्यावर अपेक्षासाठी वीणाताई स्वतः चहा घेऊन येतात… चहा पान झाल्यावर सगळी काम झालेलीच असल्याने नैवेद्य दाखवण्याचा विधी राहिलेला असतो…अपेक्षा वीणाताईंसोबत स्वयंपाकघरात जाते…वीणाताई सांगतात तसं नैवेद्याचा ताट तयार करते..त्यानंतर नर्मदेच्या तस्विरीसमोर पाणी फिरवून नैवेद्याचा ताट ठेवते…लागलीच अपेक्षाही जेवायला बसते…वीणाताई एका आसनावरती अपेक्षाला बसण्यास सांगतात…सांगितल्याप्रमाणे अपेक्षा आसनावरती बसते…सिंधुही आलेलीच असते हळदी-कुंकवाचा करंडा सिंधुच्याच हातात असतो कारण वीणाताई आपल्या हाताने हळदी-कुंकू लावू शकत नव्हत्या कारण सिंधू सवाष्ण असल्याने हळदी-कुंकू लावण्याचा मान वीणाताईंनी सिंधूला दिला होता…सत्यजितही आपल्या बायकोचे श्राद्ध असल्याने कैलासबरोबर घरी येणार असल्याचं वीणाताईंना माहिती असत…तेवढयात वीणाताईं आकांक्षाला बोलवायला जातात स्वयंपाकघराची खिडकी उघडीच असल्याने एक मांजर त्यातून घरात येते…सिंधू अपेक्षाला हळदी-कुंकू लावायला जाते…तेवढ्यात मांजर जोरात उडी मारते कारण एक उंदीर मांजरीला तिथूनच पळताना दिसतो आपलं भक्ष्य पकडायला म्हणून मांजर जोरात सिंधूच्या हातावरून उडी मारते…सिंधूच्या हातातला कुंकवाचा करंडा खूप जोरात उडतो…तो थेट सत्यजितच्या पायापाशी येऊन आपटतो…कारण श्राद्ध असल्याने सत्यजित कैलासबरोबर घरी येतो…घरात फक्त कुंकू आणि हळद याचा सडा  सगळीकडे पसरतो…हा सगळा प्रकार वीणाताई जिन्यावरून पाहत असतात…अपेक्षा फाटक्या तोंडाची असल्याने पटकन भडाभडा बोलू लागते…

अपेक्षा – बाई…बाई हा अपशकुन समजावा कि काय…नेमकं मला जेवायच्या वेळी असं झालं….सवाष्ण बाईला या घरात काहीच किंमत नाहीय बाई…नर्मदावहिनींचं असच झालं असणार नाही का…

कैलास – अपेक्षा…उगाच काही बोलू नकोस…शकुन अपशकुन सगळं निघून गेलंय…कुठल्या युगात वावरतेस तू…मांजर पळत गेलंय सगळ्यांनी डोळ्याने पाहिलंय…तुझ्या या भाकडकथांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही…बऱ्या बोलान उठ तिथून नाहीतर माझ्याइतकं वाईट कुणीही नसेल…

वीणाताई – कैलास….अरे तू तरी शांत राहा जरा…किती भडकशील…जेवू देत तिला…

अपेक्षा – नाही काकू…मनातलं सांगते…तुमच्या घरात सवाष्ण असणाऱ्या बाईची खूप गरज आहे…आज हा माझ्या नशिबात असा अपशकुन लिहिलाय असं मला सप्नातहि वाटलं नव्हतं…बाई ग… .! अहो…तुम्ही जरा सांभाळून राहत जा हो इथे…

कैलास – तुला म्हणायचं काय आहे नक्की…

अपेक्षा – [तिरक्या नजरेने सत्यजितकडे पाहते आणि म्हणते ] नाही म्हंटल…पण सांभाळून राहिलेलं बरं…कुणाची नजर कशी असते कुणास ठाऊक…

कैलास – तू चल इथून पटकन…या घरात सवाष्ण म्हणून जेवायचीही तुझी लायकी नाहीय…उठ पटकन…

असे म्हणून कैलास आपल्या बायकोच्या हाताला धरून तिला बाहेर काढू लागतो…इतक्यात वीणाताई कैलासाला अडवून म्हणतात…

वीणाताई – कैलास…बाळा रागावू नकोस…ती जे काही म्हणतेय सगळं बरोबर आहे…खरंच गरज आहे या घराला कर्त्या बाईची…माझ्या फुटक्या डोळ्यात ते सुखही पाहायचं नशिबात नाहीय…

कैलास – काकू थांबा…हिला कायमची अद्दल घडवायची आहे मला…तुम्ही मध्ये येऊ नका…

वीणाताई – कैलास…असं नको वागूस रे…मारून का टाकणारेस तिला…[कैलासला बाजूला सारून वीणाताई ओरडतात त्याला ]

कैलास भानावर येतो सिंधू त्याच्यासाठी पाणी घेऊन येते…अपेक्षाला स्वयंपाकघरात घेऊन जातात…अपेक्षा मनात पुटपुटत स्वयंपाकघरात जाऊन बसते…तोपर्यंत वीणाताई अपेक्षाला जेऊ घालतात…बरोबरीनेच सिंधुही जेवायला बसते…दोघी जेवण करेपर्यंत सत्यजितबरोबर वीणाताई बोलण्यासाठी बसतात…सोबत कैलासही असतो…

वीणाताई – पाहिलंस आज…सत्या…एवढंच ऐकून घ्यायचं बाकी होत मला…

सत्यजित – आई…वहिनी आहेच तशा…

कैलास – काकू…तुम्ही मध्ये आलात नाहीतर आज हाताखालूनच काढली असती तिला…

वीणाताई – अपेक्षाच हे वागणं अगदी स्वाभाविक आहे…पण जरा विचार केला ना तिच्या बोलण्याचा तर ती अगदीच बरोबर बोललीय…कदाचित नर्मदेचीही हीच इचछा असावी…

सत्यजित – काय ईच्छा असेल तिची जी राहून गेलीय असं वाटतंय तुला…?

वीणाताई – सत्या…जरा स्पष्टच बोलते…तुझं परत लग्न व्हावं असं तिलाही वाटत असेल…

सत्यजित – आई…तू धर्मसंकटात टाकू नकोस मला…मी तुला हजारदा सांगितलंय मला नाही करायचं लग्न…[सत्यजित रागाने उठून उभा राहतो]

वीणाताई – सत्या…पोरकटपणा बस झाला आता…माझं ऐकायचच नाही असं ठरवून टाकलाय का तू…माझा अंत पाहू नकोस आता तू…[वीणाताई थरथरत बोलत होत्या ]

आपल्या आईची अशी अवस्था पाहून सत्यजित घाबरला…आपल्या आईपाशी जाऊन म्हणाला…

सत्यजित – आई….सावर स्वतःला…खूप घाम फुटलाय तुला…शांत हो जरा…

कैलास – सत्या…तू का तुझा हट्ट सोडत नाही…किती दिवस काकूंनी असं राबायचं घरात…त्यांचं वय झालंय…तूच आधार आहेस त्यांचा…

वीणाताई – तत्त्य्य्याला….त्याच…काही नाहीय…खड्ड्यात गेली त्याची तत्त्व सगळी…[बोलताना त्यांची बोबडी वळते ]

सत्यजित – आई…थांब थोडं शांत हो…या वयात कोण मला मुलगी देणार आहे ग…?

इतक्यात दारात एक शिडशिडीत बांध्याची,सावळ्या रंगाची,काळ्याभोर डोळ्यांची,लांबसडक केसांची,अंगावर परकर पोलकं घातलेली मुलगी उभी असलेली कैलास पाहतो…आणि तिला पाहून म्हणतो…

कैलास – काय ग मुली…कोण पाहिजे तुला…?

ती मुलगी – माझं नाव शकुंतला हाय…मावशी आली नाही म्हणून मीच बघायला आले तिला…माझी आई वाट पाहतेय तिची लवकर येईल असं सांगितलं होत…उशीर झाला म्हणून मीच पाहायला आलेय…

सत्यजित – अलखनंदा…बाहेर ये लवकर आईला आतमध्ये घेऊन जा…

अलखनंदा – आई…चल…आत थोडा आराम कर…

वीणाताई – नाही मी इथेच थांबणार आहे….पाणी आन मला थोडं…

अलखनंदा पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात जाते…बाहेर कुणीतरी मुलगी आलीय असं सिंधूला सांगते…सिंधू लगेच आपलं जेवण उरकून बाहेर येते…तुला सांगितलं होत ना असं मला फोन न करता येऊ नकोस म्हणून…चल बाहेर लवकर…अलखनंदा ताई मी उद्या येईलच नेहमीच्या वेळेत…असे म्हणून निघू पाहते पण वीणाताई सिंधूला टोकतात …

वीणाताई – थांब ग…जरा…

सिंधू – बाईसाहेब…थांबा जरा…तुम्ही उठू नका…मीच येते तिकडं…

अपेक्षा जेवण करून बाहेर येऊन घडला प्रकार पाहतच होती…तेही आढ्या पडलेला चेहरा ठेऊन पाहत उभी होती…कैलासही रोखून आपल्या बायकोकडे पाहत होता…आणि कैलास न राहवून म्हणाला…

कैलास – चला अपेक्षा बाई…तुमचं काम संपलय…बाकी काय करायचं ते घरी गेल्यावर…काकू मी आलोच सोडून हिला…

काहीसा तणतणतच कैलास अपेक्षाला घेऊन तिथून निघून जातो…तोपर्यंत वीणाताई थोड्या सावरलेल्या असतात…सोफ्यावर बसतात आणि सिंधुकडे चौकशी करू लागतात…

वीणाताई – सिंधू…तुला मी एक काम सांगितलं होत…केलंस कि नाही तू माझं काम ?

सिंधू – बाईसाहेब माझ्या लक्षात आहे…आता नर्मदाताईंसारखी मुलगी शोधायची म्हणजे ढिगभर कापडामधून सुई शोधण्यासारखं मोठं दिव्यच काम आहे की…जरा वेळ लागेलच की…

वीणाताई – हि मुलगी कोण आहे…तुझ्यासोबत आहे ती…

सिंधू – हि होय…हि ना शकुंतला आहे…माझी बहीण आहे ना कावेरी तिची मुलगी शकू…आम्ही शकूच म्हणतो तिला…

वीणाताई – काय करते ही शकू…?

सिंधू – घरीच असते की…करणार काय…दुसरं…हिचा बाप आहे नुसता पेताड…अजून एक भाऊ पण हाय हिच्या पाटचा घरी कमावती फक्त हिची आय…आणि काही शकुबी कमावतीय…दहावी झालीय फक्त हिची…हुशार हाय पण शकू…

वीणाताई – असं…[असे म्हणून वीणाताई नर्मदेच्या तस्विरीसमोर जाऊन उभ्या राहतात मनातच काहीतरी ठरवतात] काहीही करून माझ्या सत्याचं लग्न जमू दे…

इतक्यात नर्मदेच्या फोटोवरच लाल फुल नेमकं नैवेद्याच्या ताटात पडत…वीणाताई त्या ताटाकडे पाहत असतात…तिथे सत्यजित , अलखनंदा,सिंधू आणि शकुंतला सगळेच असतात…वीणाताई मिश्कीलपणे हसतात…आई अचानक कशी काय हसायला लागली म्हणून नवलाने सगळे तिच्याकडं पाहू लागतात…हसणं थांबवून वीणाताई स्वयंपाकघरात जात असताना सिंधूला म्हणतात…

वीणाताई – सिंधू…तू अजून पाच दिवसांचा अवधी घे…काम जमलं पाहिजे…नाही जमलं तर…मी जे म्हणेल ते ऐकावं लागेल तुला…पटकन कामाला लागशील तू आता…

सिंधू – व्हय बाईसाहेब…म्या जाऊ आता…

असे म्हणून सिंधू आपल्या मालकिणीचा निरोप घेते…सिंधू घरी गेल्यावर सत्यजितसाठी अगदी नर्मदेसारखी मुलगी पाहते की वीणाताईंचं मुलगी पाहतात…कशी असते मुधोळकरांची सून पाहुयात पुढच्या भागात…