Ritbhatmarathi

Search
Close this search box.

अबोल प्रेमाची अधुरी कहाणी (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२

©® अनुराधा कल्याणी

तो मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आणि ती एका शिक्षकाची मुलगी म्हणजे तशी मध्यमवर्गीय कुटुंबातीलच म्हणावी अशी…राधा…कॉलेजचे ते फुलपंखी दिवस होते. अगदी साधीशी राहाणारी राधा आज मात्र कॉलेजला जाताना लक्षपूर्वक तयार झाली होती.फिकट निळ्या रंगाची साडी, तशाच रंगाच्या बांगड्या, कानातल्या नाजूक निळ्या खड्यांच्या कुड्या, गळ्यातली छोटीशी चेन, पायातले पैंजण, कपाळावर छोटीशी टिकली, डोळ्यातली हलकीशी काजळरेषा आणि लांबसडक वेणीवर माळलेला गजरा..अशी सुंदर दिसत होती राधा. आई म्हणालीसुद्धा काय ग राधे, आज काही विशेष आहे का कॉलेजमध्ये ईतकी निगुतीनं तयार झालीयेस ती..राधा हसून म्हणाली असं काही नाही ग आई सहजच तयार झालेय. बरं जाऊ मी आता…आणि मैत्रिणीबरोबर राधा निघाली.

      कॉलेज अगदी चालण्याच्या अंतरावर असल्याने सगळे मित्र मैत्रिणी चालतच जायचे कॉलेजला. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी आणि सकाळचं प्रसन्न वातावरण सगळेच चालत चालले होते. राधाही चालत होती पण तिची नजर उगाचच मागेपुढे होत होती. कुणाला तरी शोधत होती. तीच्या मनात एक अनामिक हूरहूर दाटून आली होती. पण तो दिसलाच नाही. तीला आठवलं काल वर्गात सहज त्याच्याकडे नजर गेल्यावर त्याने केलेलं ते स्मितहास्य तीच्या काळजात आरपार घुसलं होतं. नकळत तिनंही हसून प्रतिसाद दिला होता. नजरेची भाषा नजरेला कळली होती. राधा एका अलवार धुंदीतच घरी आली होती आणि आज ईतकी तयार होऊन  केवळ त्याला शोधत होती. आज तीला बघायचं होतं काल त्याने सहजच स्मित केलं असेल का? की काही वेगळं घडणार आहे. कॉलेजच्या गेटमधून आत जातानाही तीची नजर त्याला शोधत होती. पण तो दिसलाच नाही. आज आलाच नसेल का? राधा थोडी खट्टू झाली. व-हांड्यातून वर्गाकडे जातानाही ती बघत होती आणि तीला तो दिसला. व-हांड्याच्या कठड्याला रेलून उभा असलेला तो. अधीरपणे ती जरा जास्त भरभर चालत गेली. त्याच्याजवळून वर्गात जाताना तीनं त्याच्याकडे बघीतलं पण त्याचं लक्षच नव्हतं. राधा हिरमुसली, मनात म्हणाली.. मी आज याच्यासाठी ईतकी तयार होऊन आलेय आणि हा माझ्याकडे न बघता कठड्याला रेलून बघतोय काय तर कॉलेजभोवती असलेली झाडं, पानंफुलं आणि पालापाचोळा… दुष्ट मेला….अस्सा राग आलाय ना….जा आता मीही नाहीच बघायची तुझ्याकडे…ती वर्गात जायला निघाली तरीही नकळत डोळ्यांच्या कोप-यातून त्याच्याकडे बघत होतीच ईतक्यात त्याच्या मित्राने त्याच्या पाठीवर मारलेली थाप आणि बोललेले शब्द तीच्या कानावर आले….काय रे काय बघतोयसं मोगरीच्या वासाने धुंद झाला नाहीस का, की उगाच आपला न कळण्याचा बहाणा चाललाय…आणि तीच्या तिरक्या नजरेला त्याच्या ओठांच्या कोप-यातलं ते मंद हसू दिसलं…राधा बावरली थोडीशी अडखळली आणि समजून चुकली कालचं स्मित सहजच नव्हतं दिलं याने. तोही वर्गात आला, ऊरभरून श्वास घेत मित्राला मोठ्याने म्हणाला ” यार…मोगरीच्या वासाने जादू केलेय की मोगरीचा गजरा घालणारीनं काही समजेना झालयं” आणि सा-या वर्गात हशा उसळला. तीनंही लाजून मान घातली. संध्याकाळी घरी जाताना ती मुद्दामहून मागे रेंगाळली. आता तीला त्याचं नाव जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. तो जातच होता ईतक्यात त्याच्या मित्राने त्याला हाक मारली.. अरे कृष्णा, थांब ना दोघं मिळूनच घरी जाऊया. कृष्णा….किती सुंदर नाव आहे याचं. आता राधा मनाने पूर्ण कृष्णमय होऊन गेली.

       दोघांचीही प्रिती बहरू लागली.अबोल प्रीत. कारण अजूनही दोघं एकमेकांशी बोलले नव्हते. फक्त नजरेची अबोल भाषा. तीनं त्याच्याकडे बघीतलं की तिच्या बोलक्या डोळ्यात त्याला समजायचं तीला काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी  म्हणायचं आहे. आणि प्रतिसाद म्हणून तो तीच्याकडे बघून हसला की त्याला आपलं म्हणणं समजलं, त्यानं आपलं ऐकलं या अविर्भावात राधा हुरळून जायची. दोघांचीही एकमेकांशी न बोलता बहरत जाणारी अबोल प्रीत. दिवस जात होते . बोलण्याची संधी मिळत नव्हती. खरंतर हे कॉलेजचं शेवटचं वर्ष चालू होतं. आणि राधा याच वर्षी कॉलेजमध्ये आली होती. तीच्या वडिलांची बदली होऊन ती या गावात आली होती. पहिले चार महिने रुळण्यात कसे गेले ते समजलेच नाही आणि आता हा कृष्णा असा अलगद तीच्या मनात उतरला होता. दोघांमध्ये एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. जुना काळ आणि जुने दिवस. एकमेकांशी संपर्क साधण्याचं एकमेव साधन म्हणजे पत्र. एकदिवस धाडस करून कृष्णाने तीला पहिलं प्रेमपत्र लिहीलं… सुरवातीला प्रिय राधा..मग एक छोटीशी कविता…आणि मधे मनातल्या सगळ्या भावना आणि शेवटी लिहीलं…तुझाच कृष्णा. राधा पत्र वाचून मोहरून गेली होती..तीचंही त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला कळवण्याची संधी तीला मिळत नव्हती. अशातच परिक्षेचे दिवस जवळ आल्याने आणि शेवटचं वर्ष असल्याने सगळेच आभ्यासात गढून गेले.

      नियती मात्र गालातल्या गालात हसत पुढची खेळी खेळायला सज्ज झाली होती. राधाला काही न विचारता घरच्यांनी अचानक चांगलं स्थळ आलं म्हणून तीचं लग्न ठरवलं.  सगळं ईतकं अचानक झालं होतं की कृष्णाला ती सांगूही शकत नव्हती. राधा आतल्या आत कुढत होती. रडत होती, प्रेम अधुरं राहिलं, कृष्णाशी बोलताही आलं नाही याची खंत मनात धरून झुरत होती. कृष्णाही संभ्रमात पडला होता. तीनं त्याच्या प्रेमपत्राला उत्तरही दिलं नव्हतं. आणि आजकाल ती अशी शांत का असते. मैत्रिणींशीही जास्त बोलत नाही.तीच्या बोलक्या डोळ्यात वेगळीच भावना का जाणवतेय. हे सगळं कळत असून दिसत असूनही तिच्याशी कधीच न बोललेला कृष्णा तीला काही विचारूही शकत नव्हता. हताश होत होता. त्यातच परिक्षा संपल्या. कॉलेजही बंद झालं. राधा दिसायचीच बंद झाली. ती दिसेल म्हणून कृष्णा तीच्या घराच्या वाटेवर रेंगाळायचा, वाट बघायचा पण नंतर ती कधी दिसलीच नाही आणि एक दिवस त्याला समजलं परिक्षा संपल्या संपल्या घरच्यांनी राधाचं लग्न लावून दिलं. कृष्णा कोसळून गेला. सैरभैर झाला. त्याला समजून चुकलं राधा त्याची कधीच होणार नाही आता ती परक्याची झाली. अबोल प्रिती अधुरीच राहिली.

      असेच दिवस सरत होते त्यानेही स्वतःला व्यापात गुंतवून घेतलं. पण एकही दिवस असा गेला नाही की त्याला राधाची आठवण आली नाही. त्याला राधाची काहीही खबरबात मिळत नव्हती. या गोष्टीला जवळजवळ २५ वर्ष झाली आणि आज अचानक गावाच्या बाजारात राधा दिसली. खंगलेली, ओढलेली, बोलके डोळे विझून गेलेली राधा….त्याला राहावलं नाही आणि त्याने तीला हाक मारली राधा…।। आणि तीनं आवाजाच्या दिशेनं वळून बघीतलं तीचा कधीही न होऊ शकलेला, एकदाही न बोललेला  कृष्णा तीला आवाज देत होता. एका ओढीनं ती त्याच्याकडे बघत असतानाच कृष्णा जवळ आला म्हणाला…राधा..कशी आहेस? आणि टचकन् तीच्या डोळ्यात पाणी आलं. ईतक्या वर्षानंतरही कृष्णाला तीच्या डोळ्यांची भाषा समजली. राधा, चल थोडं बसूयात का जवळच्या मंदिरात. काही न बोलता राधा त्याच्यामागून चालू लागली. देवीला नमस्कार करून दोघंही एका झाडाखालच्या बाकड्यावर सावलीत बसले. अजूनही राधा एक अक्षरही बोलली नव्हती. कृष्णानं तीला विचारलं राधा..मला सांगशील कशी आहेस? कुठं असतेस? काय करतेस? आणि अशी ओढलेली, खंगलेली, हताश, का दिसतेस? कसलं दुःख आहे तुला, सासरी सुखी आहेस ना? माझी का नाही झालीस तू.. मी तुला फुलासारखी जपली असती. राधाने मान वर करून त्याच्याकडे बघीतलं तीचे डोळे भरून आले होती. ती म्हणाली, माझ्या नव-यानेही मला फुलासारखीच जपायचं वचन माझ्या आईवडिलांना दिलं होतं पण लग्नानंतर तो बदलला. खूप संशयी आणि हेकेखोर स्वभावाचा नवरा मिळाला रे मला. सतत एका दडपणाखाली वावरले आणि जगले मी. सुख, माया, प्रेम, आपुलकी, दिलासा मला कधीच मिळाला नाही. तुला सांगते कृष्णा, सतत अपमान आणि मानहानी होत होती माझी. बाहेर जायची बंदी होती. माहेरीही पाठवत नव्हता नवरा माझा. सतत मानसिक छळ आणि हे सगळं कमी म्हणून हातही उचलायचा माझ्यावर…हे ऐकताच कृष्णानं झटकन राधाचा हात धरला…कृष्णाचा राधाला झालेला पहिला स्पर्श पण हा स्पर्श मोहरून जाणारा नव्हता तर राधाला मी आहे ना ग….असा दिलासा देणारा होता. कृष्णाचा हात हातात घेऊन राधा फक्त मूक अश्रू ढाळत राहीली. तीला कृष्णाची क्षमा मागायची होती. प्रेमपत्राला उत्तर का देऊ शकली नाही ते सांगायचं होतं पण ती आज पुन्हा एकदा मूक होऊन गेली होती. तीनं त्याच्यासाठी केलेल्या कविता जशा निशब्द होऊन तीच्या वहीतच राहिल्या तशीच ती अबोल झाली होती. आज त्यांची अबोल प्रिती एका वेगळ्या वळणावर पोहोचली होती.दोघांचही जगण्याचं आभाळ वेगळं झालं होतं. राधाची ससेहोलपट बघून कृष्णा उन्मळून गेला होता. त्याच्या निरागस राधेचा काय गुन्हा होता म्हणून नियतीनं तीला ही शिक्षा दिली असेल हा विचार त्याचं काळीज कुरतडत जात होता. आपण राधासाठी काहीच करू शकणार नाही या विचारानं हैराण झाला होता. डोळे भरून येत होते त्याचे. त्याचं लक्ष राधाकडे गेलं तीनं अजूनही त्याचा हात तीच्या हातात  तसाच घट्ट धरून ठेवला होता, सोडला नव्हता, ती त्याला सांगत होती..कृष्णा का नाही हा हात मी कायमचा असा आधारासाठी घेऊ शकले. वेळीच तुझ्याशी बोलले असते तर आज हक्कानं तुझ्या खांद्यावर विसावले असते, आपलं जगणंच वेगळं होऊन गेलं असतं आयुष्य वेगळं होऊन गेलं असतं. नियतीनं का रे आपल्याला वेगळं केलं? अबोल असलं तरी खरं प्रेम होत ना रे आपलं, का त्याची पूर्तता होऊ शकली नाही. काय बोलणार होता कृष्णा. निरूत्तर होऊन गेला होता तो. वेळीच न बोलल्याची, भावना व्यक्त न केल्याची शिक्षा दोघंही भोगत होते.

      खूप वेळ शांत बसल्यानंतर राधा अचानक म्हणाली मला जायला हवं कृष्णा. मी नव-याची मनधरणी करून दोन दिवसासाठीच माहेरी आले होते. आईची तब्येत बरी नाही म्हणून बघायला. कृष्णानं विचारलं परत कधी भेटशील? राधाच्या डोळ्यात पाणी तरळलं डोळेभरून कृष्णाकडे बघत, “कदाचित कधीच नाही” असं म्हणून राधा झटकन ऊठून मागे वळूनही न बघता चालू लागली. आजूबाजूचं भान विसरून कृष्णा तीला हाक मारत राहिला पण राधाने मागे बघीतलंच नाही. ती निघून गेली. माझी राधा ईतकी कठोर का झाली? मागे वळूनही न बघता का निघून गेली? पुन्हा भेटणार नाही का म्हणाली? या प्रश्नांच्या गर्तेत खोल जात असतानाच त्याच्या खांद्यावर त्याच्या मित्राने हलकेच हात ठेवला. चमकून कृष्णाने वर बघीतलं त्याचा मित्र त्याला आधार देत  म्हणाला मी तुम्हा दोघांना खूप वेळापासून बघत होतो. झाडाआडून तुमचं बोलणंही ऐकलं मी. आता तुला प्रश्न पडलाय ना,  राधा तुला कधीच भेटणार नाही  असं का म्हणाली, तर ऐक…कृष्णा.. राधाला कॅन्सर झालाय. डॉक्टरांनी तीला थोड्याच दिवसांची मुदत दिलेय. सासरी खूप छळ होत होता तीचा. पण कोणालाही न सांगता तीनं एकटीनं सोसलं सगळं. आणि आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली असताना तुमच्या ख-या प्रेमानं ईतक्या वर्षांनी तुमची भेट घडवून आणली. आणि तीही अशी अधुरी. तुला माहितीय का कृष्णा, ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं, त्याला भेटण्याची आस मनात ठेऊन ईतकं सारं सोसलं आज त्याची भेट झाली त्याच्याशी मनातलं बोलता आलं या विचारानं राधा आता निश्चिंत झाली असेल कदाचित तिची हीच शेवटची ईच्छा असेल. आणि नियती कितीही कठोर असली तरी तीला तुमच्या प्रेमापुढं झुकावंच लागलं. तीची ईच्छा पूर्ण करावीच लागली तीला. तुमची भेट झाली.

      आता स्वतःला सावर कृष्णा…ईतकी वर्ष तीच्याशिवाय तू एकट्याने केलेला तुझ्या आयुष्याचा प्रवास तुला असाच पुढं न्यायचा आहे….आता तू ख-या अर्थाने एकटा राहिलास कृष्णा….तुमची अबोल प्रेमकहाणी अधुरीच राहाणार होती आणि अधुरीच राहिली…आपलं मन आणि हृदय पूर्णपणे राधेला दिलेल्या कृष्णानं कधीच लग्न केलं नव्हतं…
अनुराधा कल्याणी. पुणे.

========================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *