Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

खिडकीतून उन्हाची तिरीप जशी तिच्या डोळ्यांवर आली तशी ती पटकन उठून
बसायचा प्रयत्न करू लागली. पण त्या मऊ मऊ गादीतून तिला उठताच येत
नव्हतं. ती जितका उठायचा प्रयत्न करत होती तितकी परत गादीत आत जात
होती. मग ती तशीच परत पडून राहिली. उशीवर डोकं ठेवून. अलगद डोळे उघडले
किती प्रकारची झुंबरं छताला टांगली होती. रंगीबेरंगी. एसी. चा स्पीड कमी करावा
का? तिला वाटलं. पण असुदे बरं वाटतंय गार गार! एरवी कुठे होता गारवा
नाहीतरी आयुष्यात? सदा रखरखीत…
तिथून तिची नजर ड्रेसिंग टेबलकडे वळली. अनेक उंची अत्तरं, मेकअपबॉक्स सारं
सारं तिला दिसत होतं. 100 प्रकारच्या लिपस्टिक, 50 प्रकारची नेलपेंट, तेवढीच
निरनिराळी क्रीम्स, पावडरी, सेंटच्या बाटल्या, सुंदरसा आरसा! मेकअप बॉक्स.
तिथून तिने नजर बंद कपाटाकडे वळवली. जणू त्या कपाटाच्या दारातून तिला
आरपार दिसत होतं. निरनिराळ्या देश-परदेशातील साड्या, त्यावर मॅचिंगचे उंची
डिझाईनचे ब्लाऊज. मॅचिंग पेटीकोट. तितकेच सलवार कमीज, जीन्स, स्कर्ट
सगळ्या प्रकारचे मॉडर्न स्टाईलचे कपडे! किती ते कपडे अबब! कधी घालणार मी हे
कपडे? अत्ता अंगावरची साडी तरी काय कमीतला आहे? चांगली 5000 चा आहे. ती
उठली. अंगावरचा जाडजूड रग तिने बाजूला केला. आरशात आपलं रूप न्याहाळलं.
चेहर्‍यावर श्रीमंतीची चांगलीच झाक आली होती. पैसा …. पैसा असलं की, सगळं
मिळतं. तिच्या मनात विचार आला. ती विषण्ण हसली.
ती सरावाने आपलं आवरत होती. हात भराभरा चालत होते. एकदम तिला आठवलं
काहीतरी.. जबरदस्त अरे हो आपण हो आपण सोन्याचा नेकलेस टाकला होता.
आजच मिळणार होता. जाऊन घेऊन यायला हवा. कसं जायचं? अरे विचार कशाला
करायचा ड्रायव्हरला गाडी काढायला सांगुया. ती बाहेर आली, ड्रायव्हरने गाडी
तयारच ठेवली होती. घराबाहेरच्या आरशात तिने आपलं रूपडं परत न्याहाळलं.
गार्डनची सुरेख पिवळी साडी. त्याला मॅचिंग सँडल्स, मॅचिंग बांगड्या सगळं काही

मॅचिंग मिस मॅच काहीच नाही. आता तो नेकलेस यावर घातला की, आपलं स्वप्नं
पुरं होणार. ती जणू हवेवर तरंगत होती. तरंगत तरंगतच ती दुकानात पोहोचली.
दारावरच्या माणसाने तिच्याकडे बघितलं. तिला जरा विचित्र वाटलं, पण ती
जलदगतीने दुकानाच्या काऊंटरकडे वळली. तिने काऊंटरवरच्या माणसाला नेकलेस
तयार झालाय का विचारलं.
‘‘कसला नेकलेस?’’ त्यानं तिरसटासारखं विचारलं.
‘‘मी तुम्हाला ऑर्डर केला होता? आज तयार होणार होता.’’
‘‘पावती आहे का?’’
‘‘नाही. पावतीची काय गरज?’’
‘‘तुम्ही मला ओळखत नाही का?’’
‘‘तुम्ही काय महाराणी लागून गेलात का?’’
त्याच्या अशा बोलण्याने तिला रागच आला.
‘‘बोल किती पैसे हवेत तुला? तो समोर लावलेला नेकलेस मी विकत घेऊ शकते.’’
‘‘द्या मग 25 लाख’’ तो कुस्तितपणे म्हणाला.
त्याने दारावरच्या सिक्युरिटीला काहीतरी सांगितलं. तो तिच्या समोर येऊन उभा
राहिला. तिच्या हाताला त्यानं धरलं होतं.
तिने आपल्या सोनेरी पर्समध्ये हात घातला. तेवढ्यात समोरच्या आरशात तिला
आपलं रूप दिसलं. वेडंबिद्र, साधीशीच साडी. अंगावर एकही दागिना नाही. कित्येक
दिवसांत पावडर पण लागलेली नाही चेहर्‍याला. मग आपली गाडी, ड्रायव्हर?
तिच्या डोक्याला काहीतरी लागलं. त्या सिक्युरिटीने तिला बाहेर ढकललं होतं.
ती परत आपल्या घराकडे धावली. एका पडक्या घरात घुसली. मगाचचा श्रीमंती
वाडा गायब झाला होता. कुठे गेला तो वाडा, ती श्रीमंती? तो नेकलेस? भास होता
का सारा? तिचं तिलाच काही समजत नव्हतं.
दूर कुठेतरी गाणं लागलं होतं, ‘आभास हा छळतो तुला छळतो मला…’’
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

======================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter